BMC Election : बेस्ट, एसटीलाही लागली इलेक्शन ड्युटी; प्रवासी सेवेवर गंभीर परिणाम होणार

मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून शहर व उपनगरांत धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या तब्बल १,०२३ बस निवडणूक कामासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहने ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून शहर व उपनगरांत धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या तब्बल १,०२३ बस निवडणूक कामासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. तर खासगी १,१६० बसेस आणि एसटीच्या १०१ बसेस निवडणूक ड्युटीवर असणार आहेत. १३ ते १६ जानेवारी या कालावधीत मुंबईतील प्रवासी बससेवेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

निवडणूक केंद्रांवर ईव्हीएम, मतदान साहित्य तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी बेस्टच्या बसेसचा वापर केला जाणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार संबंधित प्रभागांमध्ये प्रादेशिक परिवहन विभागामार्फत ही वाहने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. १३ जानेवारीच्या रात्रीपासून १५ जानेवारीच्या रात्रीपर्यंत या बस निवडणूक सेवेच्या कामात कार्यरत राहणार आहेत.

बेस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भाडेतत्त्वावरील बसचे दर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून निश्चित केले जात आहेत. निवडणूक व त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण होताच या सर्व बसेस तातडीने पुन्हा बेस्ट उपक्रमाकडे सुपूर्द केल्या जाणार आहेत. या बसेससोबत बेस्टचे चालक असतील; मात्र कंडक्टरची गरज नसल्याने त्यांची नियुक्ती करण्यात येणार नाही.

मुंबईकरांची गैरसोय होणार

निवडणूक सेवेसाठी मोठ्या प्रमाणावर बस उपलब्ध करून दिल्याने मुंबईकर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मागील लोकसभा निवडणुकीवेळी उन्हाळ्याचा काळ आणि प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असल्याने त्रास फारसा जाणवला नव्हता. मात्र यावेळी खासगी कार्यालयांतील कर्मचारी, रोजचे बेस्ट प्रवासी यांना कमी बसेस, वाढलेली गर्दी आणि लांब रांगा यांचा सामना करावा लागू शकतो.

अशा आहेत गाड्या निवडणूक सेवेत

  • खासगी बसेस ११६० - ३५ आसनी

  • बेस्ट १,०२३ - मिडी - ४४० बसेस

  • एसटी १०१ - ४० ते ५० आसनी

logo
marathi.freepressjournal.in