BMC Election : भाजप १४०, तर शिवसेना ८७ जागा लढवणार?

महायुतीचे सगळं नीट चाललंय, महायुती म्हणून भाजप-शिवसेना एकत्रच असून फक्त जागावाटपाची घोषणा लवकरच करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. महायुतीतील मोठा भाऊ भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला असून भाजप १४०, तर शिवसेना ८७ जागा लढवणार असल्याचे समजते.
BMC Election : भाजप १४०, तर शिवसेना ८७ जागा लढवणार?
Published on

मुंबई : महायुतीचे सगळं नीट चाललंय, महायुती म्हणून भाजप-शिवसेना एकत्रच असून फक्त जागावाटपाची घोषणा लवकरच करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. महायुतीतील मोठा भाऊ भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जागावाटपाचा फार्म्युला ठरला असून भाजप १४०, तर शिवसेना ८७ जागा लढवणार असल्याचे समजते. दरम्यान, सत्तेच्या आमिषापोटी उद्धव ठाकरे देशविरोधी, धर्मविरोधी, मानवताविरोधी लोकांना पक्षात प्रवेश देत आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

‘वीर बाल दिवस’निमित्त सायन, जीटीबी नगर येथील गुरुद्वारात आयोजित कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईतील २२७ प्रभागात कुठे कोणाचा उमेदवार उभा करायचा, जिंकून येणाऱ्या जागेवर उमेदवार उभा करण्याबाबत महायुती तसेच महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेत जागावाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू असून, आता जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. मुंबई महापालिकेच्या २२७ जागांपैकी भाजप १४० आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना ८७ जागा लढवणार असल्याचे समजते.

अजितदादांच्या राष्ट्रवादीची २७ जागांवर चाचपणी

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी नवाब मलिक यांच्यावर सोपवली आहे. भाजपने नवाब मलिक यांच्या नावाला विरोध केला आहे. मात्र, राष्ट्रवादी नवाब मलिक यांच्या नावावर ठाम आहे. त्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुंबईत २७ जागांचा प्रस्ताव महायुतीतील भाजप-शिवसेनेला दिला आहे. जागावाटपावर चर्चा करून २० जागा मिळाव्यात यावर राष्ट्रवादी ठाम आहे. मात्र, नवाब मलिक निवडणूक प्रक्रियेत असल्याने महायुतीत राष्ट्रवादीला साइड ट्रॅक करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे मुंबईत २७ जागांवर लढण्यासाठी राष्ट्रवादीकडून चाचपणी सुरू असून, स्वतंत्रपणे लढण्याची तयारी राष्ट्रवादीने केल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in