

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून, ठाकरेंचा बालेकिल्ला मानले जाणाऱ्या मुंबईत मोठी जबाबदारी आता शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांच्यावर सोपविली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप व शिंदे गटाकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निलेश राणेंच्या खांद्यावर काही महत्त्वाच्या भागांतील प्रचाराची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा दबदबा असलेल्या वरळी, लालबाग, माहीम, शिवडी आणि दादरसारख्या मराठीबहुल भागांमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी निलेश राणेंची निवड केल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरेंचा पारंपरिक प्रभाव असलेल्या मतदारसंघांमध्ये काट्याची टक्कर देण्यासाठी महायुतीकडून आक्रमक रणनीती आखण्यात येत आहे. त्यामध्ये निलेश राणेंची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे माहिती समोर येत आहे. विशेषतः वरळी, लालबाग, माहीम, शिवडी आणि दादर या भागांमध्ये राणेंची तोफ धडाडणार असल्याची माहिती सूत्रांकडून दिली आहे. या परिसरात आक्रमक प्रचार, जाहीर सभा, संपर्क दौरे आणि थेट स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत ठाकरे गटाला आव्हान देण्याची जबाबदारी निलेश राणेंकडे सोपवण्यात येणार आहे.
तसेच मुंबईतील मराठी मतदार, पुनर्विकास प्रकल्प, स्थानिक नागरी प्रश्न आणि शिवसेनेच्या परंपरागत मतपेढींवर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती आखली जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नगरपरिषद निवडणुकीत मालवणमध्ये निलेश राणेंनी भगवा फडकवला होता. त्या यशाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीही निलेश राणेंवर विश्वास टाकत जबाबदारी सोपवली जाऊ शकते.