

मुंबई : निवडणूक काळात उमेदवारांच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी पार पाडतात ते कार्यकर्ते. प्रचारात काळात कार्यकर्त्यांना चहा-नाश्ता, जेवण देण्याबाबत मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दरसूची निश्चित केली आहे. यात १५ रुपयांत वडापाव, तर ७० रुपयांत पावभाजी मिळणार असून ११० रुपयांत जेवण मिळणार आहे. मात्र वाढती महागाई लक्षात घेता खर्चाचा ताळमेळ साधण्यात उमेदवारांना कसरत करावी लागत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाने महापालिकानिहाय ९ ते १५ लाख रुपये खर्चाची मर्यादा ठेवली आहे. मुंबई महापालिकेने उमेदवारांना कराव्या लागणाऱ्या खर्चाची दरसूची तयार केली आहे. केलेला खर्चाची नोंद करणे बंधनकारक आहे. एकदा उमेदवारी निश्चित झाली की उमेदवाराचा दैनंदिन खर्चाचा हिशेब पालिकेच्या निवडणूक विभागाकडून दररोज नोंदवण्यात येतो. तो उमेदवारांनाही सादर करणे बंधनकारक आहे. हा खर्च दाखवताना त्यांनी कोणत्या वस्तूचे किती पैसे लावले, याचे दर मुंबई महानगरपालिकेकडून आयोगाच्या सूचनेनुसार ठरवून दिले आहेत. उमेदवारांच्या खर्चाची नोंद ठेवण्यासाठी पालिकेकडून भरारी पथकेही नेमण्यात आली आहेत. हा खर्च त्यांना त्यांच्या स्वतंत्र बँक खात्यातून करावा लागणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मुंबई पालिकेकडून टाचणीपासून ते जेवणाचे, गाड्यांचे सर्व दर ठरवून दिले आहेत.
बँड, फटाक्यांचे दर निश्चित
सध्या थंडीचे दिवस असल्याने कार्यकर्त्यांना स्कार्फ, टोप्या, फेसमास्क यांची गरज लागू शकते. त्याचेही दर पालिकेने निश्चित केले आहेत. शिवाय राहण्याची व्यवस्था, सभांसाठी लागणाऱ्या खुर्च्या, स्टेजची व्यवस्था, फटाके, बँड पथक, प्रचार साहित्य व सुरक्षारक्षकांचे दरही निश्चित करण्यात आले आहेत.
खाद्यपदार्थ - दर (रुपयांमध्ये)
चहा - १०
कॉफी - १२
पोहे / उपमा / शिरा / इडली सांबार / साबुदाणा खिचडी / मिसळ पाव / ढोकळा / भेळ / अंडा ऑम्लेट (प्रति प्लेट) - २५
वडापाव (प्रति प्लेट) - १५
लंच / डिनर (बेग) - ११०
लंच / डिनर (नॉनव्हेज) - १४०
पुलाव - ७५, पुरी भाजी - ६०
कोल्ड्रिंक (छोटी बाटली) - १०
कोल्ड्रिंक (मोठी बाटली) - ४०
पाव भाजी - ७०
पाणी बाटली (२०० मि.ली.) - ५
पाणी बाटली (५०० मि.ली.) - १०
पाणी बाटली १ लिटर - २०
पाण्याचा जार २० लिटर - ८०
नाश्ता -३८
साहित्य - दर (रुपयांमध्ये)
ढोल, ताशा, झांज -१००० (प्रति माणशी)
बँड पथक - १२०० (प्रति माणशी)
सुरक्षारक्षक (प्रति दिन) - महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या दराप्रमाणे (सोबत जेवण )
फटाके (२०० फुटांच्या माळा) - ५००
सुतळी बॉम्ब (प्रति नग) - ५०
आकाशातील आतषबाजी (प्रति नग) - १५००
स्कार्फ (प्रति नग) - १०
फेस मास्क (प्रति नग) - ५
टोपी (प्रति नग) - १२