ठाकरे गटासाठी BMC निवडणूक आव्हानात्मक; पूर्वाश्रमीची शिदोरी घेऊन मुंबईकरांसमोर जाणार

राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला लोकांनी नाकारल्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवसेना उबाठा गटाच्या एका आमदाराने दिली.
ठाकरे गटासाठी BMC निवडणूक आव्हानात्मक; पूर्वाश्रमीची शिदोरी घेऊन मुंबईकरांसमोर जाणार
Published on

पूनम पोळ / मुंबई 

राज्यात विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला लोकांनी नाकारल्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवसेना उबाठा गटाच्या एका आमदाराने दिली. अशा प्रस्तावित निवडणुकीला मुंबईकर कसे प्रतिसाद देतात याची प्रतीक्षा आहे.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच पालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट हा यापूर्वी केलेले काम घेऊन जनतेसमोर जाणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक आमच्यासाठी ‘कठीण पेपर’ असून यात पैकीच्या पैकी गुण मिळतील की नाही, असा प्रश्न आम्हा सर्वांसमोर आहे, असे पक्षाच्या आमदारांनी सांगितले. 

गेल्या दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्ष दुभंगला गेला आहे. अर्ध्याहून अधिक आमदार, नगरसेवक आणि पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. यानंतर राज्यात आणि स्थानिक पातळीवरही शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. लोकसभेत मिळालेल्या यशानंतर विधानसभेतही असेच अभूतपूर्व यश मिळेल, असे चित्र असताना मात्र ठाकरे गटाला जनतेने नाकारून शिंदेंच्या शिवसेनेला डोक्यावर घेतले. त्यामुळे यंदाची निवडणूक ही ठाकरे गटाला कठीण जाईल, असा अंदाज त्यांच्याच पक्षाच्या आमदाराकडून आणि माजी नगरसेवकाकडून व्यक्त केला जात आहे.

माजी नगरसेवक नाराज

आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर काही माजी नगरसेवकांमध्ये नाराजीचे सूर आहेत. अलीकडेच मातोश्रीवर ठाकरे गटाची आढावा बैठक झाली होती. बैठकीनंतर ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. पक्षाकडून आम्हाला विश्वासात घेतले जात नसल्याचे माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे.

शिंदे गटाकडे अधिक मनुष्यबळ, निधीही

ठाकरे गटाच्या आमदाराने सांगितले की, शिंदेंचे पारडे सद्यस्थितीत जड आहे. त्यांच्याकडे मनुष्यबळासह आर्थिक बळही अधिकचे आहे. शिंदे गट स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांवर अधिक निधी खर्च करतात. जे आमच्या गटाकडून होत नाही. आम्ही जनतेला कामाचे आश्वासन देतो. हे जनतेला दिसत नाही. निवडणुकीदरम्यान जनता केवळ पैसा पाहते. त्याला आम्ही पुरून उरू शकत नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक आमच्या गटाला जड जाईल, अशी माहिती उबाठा गटाच्या आमदारांनी दिली. 

शिवसेनेचे पालिकेतील संख्याबळ

२०१७ मध्ये ठाकरे गटाचे एकूण ८४ नगरसेवक निवडून आले.

मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. 

२ नगरसेवक न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून निवडून आले. 

राज्यातील शिंदे सेनेच्या सत्तेनंतर ७ अपक्ष नगरसेवकांनी पाठिंबा दिला. 

शिवसेनेकडे एकूण नगरसेवक ९९ नगरसेवकांचे पाठबळ आहे.

शिंदे गटात गेलेले शिवसेनेतील ३६ नगरसेवक आहेत.

यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष अशा माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in