BMC Election : महायुतीचे २०७ जागांवर एकमत, २० जागांवर चर्चा सुरू

शनिवारी सायंकाळपर्यंत भाजप-शिंदेसेना महायुतीचे मुंबईतील २०७ जागांवर एकमत झाले असून २० जागांवर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.
BMC Election : महायुतीचे २०७ जागांवर एकमत, २० जागांवर चर्चा सुरू
BMC Election : महायुतीचे २०७ जागांवर एकमत, २० जागांवर चर्चा सुरू
Published on

मुंबई : मुंबई मनपासह राज्यातील विविध महापालिकेच्या निवडणूक तिकिटासाठी इच्छुकांनी पक्षनेत्यांकडे जोर लावला आहे. यावेळी कार्यकर्त्यांची बंडखोरी व अन्य पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची पळवापळवीची शक्यता लक्षात घेऊन राजकीय पक्षांनी गनिमी कावा सुरू करून उमेदवार यादी जाहीर करण्यात टाळाटाळ चालवली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या इच्छुक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळपर्यंत भाजप-शिंदेसेना महायुतीचे मुंबईतील २०७ जागांवर एकमत झाले असून २० जागांवर चर्चा सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.

मुंबई मनपासह राज्यातील २९ महापालिकांसाठी येत्या १५ जानेवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचे रणशिंग फुंकल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे, तर २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर आहे. त्यामुळे तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तशी उमेदवारांची घालमेल सुरू झाली आहे. ज्या उमेदवारांची जिंकून येण्याची खात्री आहे, अशाच उमेदवारांची लवकरच यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी मागील दाराने खात्रीदायक उमेदवारांना पक्षामार्फत गुपचूप ए-बी फॉर्मचे वाटप सुरू झाले आहे.

महायुती, मनसे, शिवसेना, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत उमेदवारांच्या नावांची घोषणा अद्याप केलेली नाही. भाजपसह दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले आहेत. त्यामुळे पक्षातील मूळ कार्यकर्त्यास डावलले, तर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तसेच, निवडून येणाऱ्या उमेदवारांची पळवापळवीची धास्ती सर्वच पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे ३० डिसेंबर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असताना उमेदवारांच्या नावाची घोषणा न करण्याचा गनिमी कावा खेळला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in