

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३६०१ सूचना व हरकती पालिकेच्या संकेतस्थळावर नोंदविल्या आहेत. या सूचना व हरकतींच्या अनुषंगाने अंतिम निर्णय काय होणार, याकडे मतदार, तसेच राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी गुरुवार, २० नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली. प्रारुप मतदार यादीवर ३ डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवण्यात येणार आहे. त्यांनतर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व हरकती व सूचनांची गांभीर्यपूर्वक दखल घेण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी पूर्वीच अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मतदारयादीमध्ये दुबार नावे आणि वगळलेली नावे चिन्हांकित करण्यात आली आहेत. तसेच, मतचोरीच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे यंदा मतदार यादीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पालिकेच्या सर्व विभागांमधून प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादीवर २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत एकूण ३ हजार ६०१ हरकती व सूचना प्राप्त झाल्या
याआधी २० ते २५ नोव्हेंबर दरम्यान एकूण ७६९ हरकती व सूचना नोंदविण्यात आल्या होत्या. त्यात पालिकेच्या एम पूर्व आणि टी विभागातून सर्वाधिक म्हणजेच प्रत्येकी २०४ व १२३ हरकती प्राप्त झाल्या. त्यांनतर, २६ नोव्हेंबर रोजी १३७१, २७ नोव्हेंबर रोजी ६६८, २८ नोव्हेंबर रोजी ३६२, २९ नोव्हेंबर रोजी ३७३ आणि ३० नोव्हेंबर रोजी केवळ ५८ सूचना व हरकती मतदारांनी नोंदविल्या. सूचना व हरकती नोंदवण्यासाठी ३ डिसेंबर हा अंतिम दिवस असणार आहे.