

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी अखेर भाजप-शिंदे गट (शिवसेना) महायुतीने जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला आहे. भाजप १३७ जागांवर तर शिवसेना (शिंदे गट) ९० जागांवर उमेदवार उभे करणार आहे. रात्री उशीरापर्यंत झालेल्या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले. दोन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून मित्रपक्षांनाही जागा देण्याचे ठरवले आहे. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिंदेसेनेचे प्रभारी सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली.
मित्रपक्षांसाठीही जागा
महायुतीतील अन्य छोट्या घटकपक्षांना सामावून घेण्याची जबाबदारी संबंधित मित्रपक्षाची असेल असे शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी सांगितले. याचा अर्थ RPI ला (आठवले गट) भाजपच्या कोट्यातील जागा सोडण्यात येतील आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेसाठी शिंदेसेना जागा सोडेल. मंगळवारी एबी फॉर्मचे वाटप पूर्ण करून दोन्ही पक्षांचे उमेदवार नामनिर्देशन अर्ज दाखल करणार आहेत. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत अर्थात ३० डिसेंबरपर्यंत आहे.
तिढा सुटला, पण अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र
सुरुवातीला भाजपने १५० हून अधिक जागांची मागणी केली होती आणि शिवसेनेला १०० च्या आसपास जागा हव्या होत्या. तर, भाजप फक्त ७५ जागा देण्यास तयार होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पातळीवर आणि वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर हा तिढा सुटल्याचे समजते. दरम्यान, महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असून त्यांनी आतापर्यंत ६४ उमेदवारांची घोषणा केली आहे.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार असून निकाल दुसऱ्या दिवशी १६ जानेवारीला लागणार आहे.