Mumbai : मराठी माणसाच्या अस्तित्वाची शेवटची लढाई! उद्धव, राज ठाकरे शिवतीर्थावर कडाडले

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी मुंबई मिळवण्यासाठी लढा सुरू होता, आजही गुजरातचा मुंबईवर डोळा आहे. हा डाव मोडून काढण्यासाठी आमच्यातील वाद बाजूला सारून आम्ही एकत्र आलोय ते मुंबईसाठी, मराठी माणसासाठी आणि हिंदूंसाठी, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली.
मराठी माणसाच्या अस्तित्वाची शेवटची लढाई! उद्धव, राज ठाकरे शिवतीर्थावर कडाडले
मराठी माणसाच्या अस्तित्वाची शेवटची लढाई! उद्धव, राज ठाकरे शिवतीर्थावर कडाडलेPhoto : X (@ShivSenaUBT_)
Published on

मुंबई : 'मुंबई वाचवण्याची तसेच मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही शेवटची लढाई आहे. त्यामुळे त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल. एका बड्या उद्योगपतीच्या भल्यासाठी भाजपने मुंबईसह अख्खा महाराष्ट्र आणि देश विकायला काढला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी मुंबई मिळवण्यासाठी लढा सुरू होता, आजही गुजरातचा मुंबईवर डोळा आहे. हा डाव मोडून काढण्यासाठी आमच्यातील वाद बाजूला सारून आम्ही एकत्र आलोय ते मुंबईसाठी, मराठी माणसासाठी आणि हिंदूंसाठी, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली.

ठाकरे ब्रँड संपवणारा अजून जन्माला आला नाही! -उद्धव

पक्ष चोरला, चिन्ह पळवले, त्यामुळे ठाकरे संपले अशी स्वप्न पाहणाऱ्यांनी माझ्यासमोर बसलेला जनसागर पाहावा. ठाकऱ्यांचे अस्तित्व ठरवणारा अजून जन्माला यायचा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी आचार्य अत्रे, एस. एम. जोशी यांच्यासोबत आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे होते. मराठीचे, मातृभाषेचे प्रेम रक्तात असावे लागते. आमच्या डोळ्यांदेखत घराचे, शहराचे, राज्याचे लचके तोडले जात असतील, तर आम्ही ठाकरे गप्प बसू असे भाजपला वाटते का?, असा रोखठोक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला.

मुंबईचा महापौर कोण होणार, हिंदू की मराठी हा वाद भाजपने सुरू केला. देवेंद्र फडणवीस यांनी आव्हान दिले की, उद्धव ठाकरे विकासावर बोलल्याचे दाखवा आणि हजार रुपये मिळवा. मला चोरांचा पैसा नको. देवेंद्र फडणवीस मीच तुम्हाला आव्हान देतो. पंतप्रधान मोदींपासून तुमच्या चेल्याचपाट्यांपर्यंत, ज्यांनी हिंदू-मुस्लिम न करता केवळ विकासावर भाषण केले आहे, असे एक तरी भाषण दाखवा. आम्ही सगळे मिळून तुम्हाला १ लाख रुपये देऊ, अशा कडक शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला.

भाजपचे हिंदुत्व, देशप्रेम हे ढोंग आहे. या ढोंगावर लाथ मारायची शिकवण मला घरातून माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिली आहे. पहलगामच्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर झाले, त्यानंतर काही दिवसानंतर अमित शहा यांचे चिरंजीव पाकिस्तानसह क्रिकेट सामने लावतात. हे यांचे हिंदुत्व आहे का?, असा सवालही त्यांनी विचारला

मेवाभाऊ तुम्ही आम्हाला शिकवू नका -उद्धव ठाकरे

मेवाभाऊ तुम्ही आम्हाला काय शिकवत आहात. सगळे एका उद्योगपतीसाठी सुरू आहे. आमची मुंबई आहे, मुंबईचे परत बॉम्बे करण्याचा यांचा डाव आहे. अण्णामलाईने भाजपच्या मनातले काळे बोलून दाखवले. सोन्यासारखी मुंबईच्या ठेवी ९२ हजार कोटींपर्यंत नेल्या होत्या, त्या यांनी ७० हजार कोटींपर्यंत नेऊन ठेवल्या आहेत. तीन लाख कोटींचा घोटाळा भाजप आणि गद्दारांनी केला आहे. भाजपला महापालिका हवी आहे कारण यांना मुंबई उद्योगपतीच्या हाती द्यायची आहे, असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

आता जर चुकलात तर मुंबईला मुकलात - राज

भाजपने महानगरपालिकेत अकोटमध्ये एमआयएमसोबत युती केली, तर बदलापूरमध्ये काँग्रेसबरोबर हात मिळवले. ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपदाचे तिकीट दिले. बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवक केले. ही हिंमत कुठून आली? हा उद्दामपणा, ही मस्ती कुठून आली? त्यामुळे मुंबई वाचवायची ही शेवटची लढाई आहे. आता जर चुकलात तर मुंबईला मुकलात. त्यामुळे त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल. भाजपने मुंबईसह अख्खा महाराष्ट्र आणि देश विकायला काढला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

‘मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठीचा बंदोबस्त केलेला आहे. बाहेरची लोक येऊन तुमच्यावर उड्या मारत आहेत. काल तमिळनाडूतून रसमलाई आली होती आणि म्हणे मुंबईचा महाराष्ट्राशी काय संबंध? पण इथे यायचा तुझाच काय संबंध आहे. यामुळेच बाळासाहेब म्हणाले होते, ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी. अनेक जैन मारवाडी इथे राहत आहेत, पण तुम्हाला कबुतरांच्या नावाने भडकावले जात आहे. मुंबईत जैन-मराठी वादावर पडदा टाकण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत मंगलप्रभात लोढा यांनी वाद मिटवला नाही, उलट समाजात जास्तीत जास्त भांडणे कसे होतील? हे पाहिले. मराठी माणसाला मुंबई एकट्यला पाडायचे त्यांचा प्लॅन आहे. पण आम्ही एकटे असलो, तरी काफी आहोत. आमच्या नको त्या वादात जाऊ नका,’ अशा शब्दांतही राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले.

‘आमच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत आहेत. पण फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी छगन भुजबळांना जेलमध्ये टाकले होते. आता मांडीला मांडी लावून बसलेत. ७० हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांचे बैलगाडी भरून पुरावे दिले आणि आता म्हणताय कोर्टात केस आहे. तुम्ही पुरावे दिले होते, तर ते आता कोर्टात द्या. मुंबई गुजरातला न्यायची यांच्या पहिल्यापासून डोक्यात आहे. मुंबई गुजरातला नेण्यासाठी पालघर जिल्हा ताब्यात घ्यावा लागेल, ठाणे जिल्ह्याचा भाग, एमएमआर रिजनचा भाग ताब्यात घ्यावा लागेल. तरच मुंबईपर्यंत पोहोचता येईल, हे त्यांना माहित आहे. एकदा मुंबई हातातून गेली, तर महाराष्ट्र झारखंडपेक्षा वेगळा करणार नाही. स्वकियांचा घात करणारी औलाद ही फक्त उडणाऱ्या पक्षांमध्येच नसते तर ती राजकीय पक्षांमध्ये असल्याचे मला कळतेय,” असा घणाघातही त्यांनी चढवला.

मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील - जयंत पाटील

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होतोय. सुरत लुटली, याचा राग आजही काहींच्या मनात आहे. आदित्य ठाकरेंवर मुंबईची जबाबदारी सोपवण्यास हरकत नाही, शिवाजी पार्क हे मैदान नसून स्वाभिमानाचे मैदान आहे. मी कालपासून मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये फिरलो, लोकांना प्रचंड आनंद आहे की, उद्धव आणि राज एकत्र आले. दोन भाऊ एकत्र आल्याचा महाराष्ट्राला अभिमान आहे. मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in