
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आतापासून कंबर कसली आहे. शिवसेना शाखांचे सर्वेक्षण करण्यासाठी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून आपल्या वॉर्डात शिवसेना अधिक मजबूत करा, आमिषाला बळी पडू नका, शाखा शाखांच्या सर्वेक्षणाचा अहवाल निरीक्षकांनी दादर येथील सेना भवनात सादर करावा, असे आदेश उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दरम्यान, आगामी निवडणूक भक्कमपणे लढा, मुंबई वाचवायला शिवसेना असा कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने नाकारले. मविआतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेलाही दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यात आगामी मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेता ठाकरेंच्या शिवसेनेने विजयासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. मुंबई महापालिकेत गेली तीन दशके ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व होते. मुंबई महापालिकेत ठाकरेंचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे.
अहवाल शिवसेना भवनात सादर करणार
गुरुवारी शिवसेनेच्या (ठाकरे) पदाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुखांशी ऑनलाइन संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. शुक्रवारपासून शाखा शाखांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील प्रत्येक शाखेसाठी एक निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली असून तो शाखेत जाऊन पदाधिकारी आणि गटप्रमुख यांच्याकडून आढावा घेईल. प्रत्येक शाखेचे पदाधिकारी आहेत की नाहीत? कोणती आणि किती पदे रिकामी आहेत? याचा अहवाल शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.