

लखनौ : येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी मुंबई भाजपने उत्तर प्रदेशातील वरिष्ठ नेत्यांची मदत मागितली आहे. प्रचारासाठी अपर्णा यादव आणि रवि किशन यांच्यासह अनेक यूपीतील नेत्यांना मुंबईत प्रचारासाठी पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे. अपर्णा या उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत, तर रवी किशन भोजपुरी अभिनेता-गायक तसेच गोरखपूरचे खासदार आहेत.
यूपीतील नेते-पदाधिकाऱ्यांना प्रचारासाठी पाठवा, अमित साटम यांचे पत्र
भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी भाजपच्या उत्तर प्रदेश अध्यक्षांना आणि संघटन सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, निवडणुकीत संघटनात्मक यश मिळवण्यासाठी पक्षाला अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय सहभाग आवश्यक आहे. उपलब्धतेनुसार यूपीमधील वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईत प्रचारासाठी पाठवावे, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. या यादीत अपर्णा यादव आणि रवि किशन यांच्यासह दिनेश लाल यादव ‘निरहुआ’, सुरेंद्र चौरसिया, मनीष कुमार जैस्वाल, शलभ मणि त्रिपाठी, अवधेश सिंह, रमेश मिश्रा, छोटूराम आणि रमेश जैस्वाल यांचा समावेश आहे.
हिंदी भाषिक मतदारांपर्यंत पोहोचण्यास मदत
उत्तर प्रदेशातील प्रमुख नेते आणि लोकप्रिय चेहऱ्यांमुळे प्रचारात उत्साह येईल आणि मतदारांशी, विशेषतः शहरातील मोठ्या हिंदी भाषिक मतदारांपर्यंत पोहचण्यास मदत होईल, असा मुंबई भाजपचा विश्वास आहे.
भाजपसाठी बीएमसी निवडणूक अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची लढत मानली जात आहे, कारण मुंबईच्या राजकारणात आपला प्रभाव वाढवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. बीएमसीची मागील मुदत फेब्रुवारी २०२२ मध्ये संपली असून, त्यानंतर प्रभाग रचना आणि इतर मागासवर्गीय (OBC) आरक्षणासंदर्भातील कायदेशीर वादांमुळे महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून चालवला जात आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून, मतमोजणी १६ जानेवारी रोजी होईल.