मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीला शुक्रवार, १६ जानेवारीला सकाळी १० वाजेपासून २३ मतमोजणी केंद्रात सुरुवात होणार आहे. या मतमोजणीसाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्याला महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे. मतमोजणीदरम्यान सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने मुंबईतील २२७ निवडणूक प्रभागांकरिता एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय अंतर्गत स्ट्राँग रूम आणि मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस खात्याकडून आवश्यक ती मान्यता प्राप्त झाली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी आज मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला.
यंत्रणांशी समन्वय
मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांची रचना व नियोजन, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधण्यात आला आहे.
मतमोजणीसाठी ७५९ पर्यवेक्षक आणि ७७० सहायक यांच्यासह ७७० चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे.
मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक आणि साहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, वाहनतळ व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत.
निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.
मतमोजणी प्रक्रियेसाठी अधिकृत प्रतिनिधी, उमेदवार तसेच माध्यम प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे.
मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने ज्या व्यक्तींना ओळखपत्र दिले आहे, अशा पात्र व्यक्तींनाच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे.