

मुंबई : मुंबई महापालिकेच्या पर्यावरण, वातावरणीय बदल विभागात गेल्या दीड वर्षांपासून अभियंत्यांची वानवा आहे. या विभागातील विविध खात्यामध्ये सुमारे ४२ अभियंत्यांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आता महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी काय भूमिका घेतात, याकडे पर्यावरण, वातावरणीय बदल विभागातील अभियंत्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई शहरांतील वाढते वायूप्रदूषण, विकासकामे यावर उपाययोजनांसह नियंत्रण व कारवाईसाठी अस्तित्वात असलेल्या मुंबई महापालिकेच्या पर्यावरण, वातावरणीय बदल विभाग मुंबई महापालिकेत ऑक्टोबर-२०२४ मध्ये कार्यान्वित करण्यात आला. मात्र हा विभाग सुरू करण्यापूर्वी संपूर्ण मनुष्यबळ घेण्यात आले नाही. सद्यस्थितीत सदर विभागात उपप्रमुख अभियंता-२, कार्यकारी अभियंता - २, सहाय्यक अभियंता - ५, दुय्यम अभियंता - ३३ अशी एकूण ४२ अभियंता संवर्गातील पदे रिक्त आहेत. ते भरण्याकडे नगर अभियंता विभागाचे दुर्लक्ष असल्याचा खुलासा पर्यावरण, वातावरणीय विभागातील एका अधिकाऱ्याने केला.
पर्यावरण, वातावरणीय बदल विभागाकडून गेल्या जुलै २०२४ पासून मुंबईतील पाव-बेकऱ्या, तंदुर भट्ट्या यांच्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी त्यांना सीएनजी गॅसवर करण्याचे न्यायालयाने पालिकेला आदेश दिलेले आहेत. तसेच सिमेंट काँक्रीट प्लांट, निर्माणधीन इमारतीच्या बांधकामस्थळी विकासकाने धूळ प्रदूषण नियंत्रित मशीन लावणे, अशा विविध कामांसाठी अभियंता वर्गाची कमतरता भासत असल्याने या कामांना ब्रेक लागत आहे.
या संवर्गातील रिक्त पदे -
उपप्रमुख अभियंता - २
कार्यकारी अभियंता - २
सहाय्यक अभियंता - ५
दुय्यम अभियंता - ३३
एकूण - ४२