

मुंबई : दुबार मतदारांचा शोध घेण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दुबार मतदारांची छाननी प्रक्रिया सुरू केली. पालिकेच्या छाननी प्रक्रियेत ११ लाख दुबार मतदारांपैकी १ लाख ६८ हजार ३५० दुबार मतदार असल्याचे उघड झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त यादीनुसार सुरुवातीला ११ लाख १ हजार ५०७ दुबार मतदारांची नोंद होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत केलेल्या सखोल तपासणीत ९ लाख ३३ हजार १५७ मतदार दुबार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईसह राज्यात दुबार मतदार, मतदार यादीत घोळ असा आरोप विरोधकांनी केला होता. त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाची भेट विरोधकांनी घेतली होती. अखेर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपल्या स्तरावर दुबार मतदारांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली. दुबार मतदारांची मोठी आकडेवारी पारंपरिक मॅन्युअल पद्धतीने तपासली असती, तर किमान तीन ते चार महिने लागले असते. मात्र, महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने तसेच एफ उत्तर व एन विभागाने संयुक्तपणे राबवलेल्या प्रायोगिक उपाययोजनांमुळे दुबार मतदार शोधण्याचे डेस्क वर्क अवघ्या तीन ते चार तासांत पूर्ण करण्यात आले. या प्रक्रियेसाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेले Election Data Extraction Software वापरण्यात आले. या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने Excel Formula वापरून एकाच वॉर्डमध्ये दोन किंवा अधिक वेळा नोंद असलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी, तसेच एकापेक्षा अधिक वॉर्डमध्ये नोंद असलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली.
या प्राथमिक छाननीनुसार, एकाच वॉर्डमधील दुबार नावे २ लाख २५ हजार ५७२, तर एकापेक्षा अधिक वॉर्डमधील नावे ८ लाख ७५ हजार ९३५ इतकी होती.
यानंतर प्रत्येक वॉर्डनिहाय सखोल पडताळणी करण्यात आली. या तपासणीनंतर दुबार मतदार निश्चित करण्यात आले असून, त्यांच्याबाबत गृहभेटी घेऊन प्रत्यक्ष पडताळणीही करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
या वॉर्डात सर्वाधिक दुबार मतदार !
महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थेट १२६,६१६ घरांना भेट देऊन पडताळणी केली. यापैकी ४८,३२८ मतदारांनी फॉर्म अ सादर केला. या फॉर्ममध्ये, दुबार मतदारांनी एकाच प्रभागात मतदान करण्याची इच्छा दर्शविली. राज्य निवडणूक आयोगाने सादर केलेल्या यादीत फक्त १५ टक्के दुबार मतदार आढळल्याचे पालिकेने नोंदवले आहे. एकूण दुबार मतदारांच्या १०० टक्के पडताळणी करण्यात आली आहे. एल वॉर्ड, के पश्चिम वॉर्ड आणि आर सेंट्रल वॉर्डमध्ये सर्वाधिक दुबार मतदार आढळले आहेत