कचऱ्यासाठी विशेष मोहीम; BMC चा सोमवारपासून उपक्रम; पंधरवड्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावणार

मुंबई महापालिकेने पावसाळ्यात नालेसफाई अपयशी ठरल्यानंतर नाल्यांमधील तरंगता कचरा काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. २९ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत कचरा काढण्यात येईल आणि त्यानंतर पालिकेने त्याची योग्य विल्हेवाट करणार असल्याची माहिती दिली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : पावसाळ्यातील नालेसफाई अपयशी ठरली असताना मुंबई महापालिकेने नाल्यांमधील तरंगता कचरा काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. २९ सप्टेंबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत कचरा काढण्यात येणार आहे. यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरात स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, मुंबईत विविध नाल्यांतील तरंगता कचरा काढण्यासाठी 'विशेष स्वच्छता मोहीम' राबविण्याचा निर्णय अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी घेतला आहे. या संदर्भात प्रमाणित निश्चित केली आहे. कार्यपद्धती

या विशेष स्वच्छता मोहिमेत निष्काळजीपणा अथवा हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. जोशी यांनी दिला आहे.

यावेळी पालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) प्रमुख नाल्यांचे (कांदळवन क्षेत्र वगळून) नाल्याभोवतालचा परिसर, उघडी गटारे यातील कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे. या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे मनुष्यबळ, स्वयंसेवी संस्थांचे कामगार तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग असणार आहे. सदर मोहीम दररोज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नाल्यातील कचरा काढणे व विल्हेवाट लावण्याची कार्यवाही केली जाणार आहे. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अभियंता आणि परीरक्षण विभागाचे अभियंता हे विभागातील कोणत्या नाल्यांतून कचरा काढायचा, याची निश्चिती करणार आहेत. यावेळी स्वच्छता मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यांत्रिक स्वच्छता यंत्रे, कचरा उचलणारी साधने, डंपर, जेसीबी, पाण्याचे टँकर तसेच फायरएक्स उपकरणे यांचा समन्वयाने वापर करण्यात येणार आहे.

मुंबईतील अनेक छोट्या-मोठ्या नाल्यांमध्ये नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. अनेक भागांतील नाले नियमितपणे स्वच्छ केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा न टाकता तो कचराकुंडीतच टाकावा.

अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त

अशी असेल मोहीम

मोहिमेत झाडलोट करणे, टाकाऊ वस्तू हटविणे, कचरा संकलन करणे तसेच संपूर्ण परिसर स्वच्छ धुवून काढणे या उपक्रमांचा समावेश असेल. पर्जन्यजल वाहिनी विभाग यांच्याद्वारे काढण्यात आलेल्या तरंगत्या कचऱ्याची विल्हेवाट घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या मार्फत केली जाईल.

logo
marathi.freepressjournal.in