

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता महापौर, उपमहापौर, विविध समित्यांचे अध्यक्ष व सदस्य पदासाठी नावे जाहीर होणार आहेत. मुंबई महापालिकेत गटनेते पद महत्वपूर्ण असून काँग्रेसने अशरफ आझमी तर मनसेने यशवंत किल्लेदार यांची गटनेतेपदी निवड केली आहे. इतर पक्षातही अनुभवी नगरसेवक इच्छुक आहेत. यात कोणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होणार आहे.
पालिका निवडणूक निकालानंतर महापौर पदासाठी येत्या २२ जानेवारीला आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या सोडतीनंतर पालिका सभागृहात महापौर पदाची निवडणूक होणार आहे. आरक्षणानुसार महापौर पदासाठी इच्छुकांची नावे पुढे येतील. महापौर निवडणुकीनंतर पक्षाचे गटनेता निवडले जाते. त्याआधी पक्षाकडून गटनेता निवडला जातो. त्यानुसार काँग्रेसने अशरफ आझमी व मनसेचे यशवंत किल्लेदार यांची निवड केली आहे. महापौर निवड झाल्यानंतर सभागृहात गटनेते पदे महापौरांकडून जाहिर केले जाते. महापालिकेत भाग घेण्यासाठी प्रत्येक पक्षाचा गटनेता हा महत्वाची भूमिका बजावत असतो. किमान सहा नगरसेवक असलेल्या पक्षाला गटनेता बनण्याचा मान मिळतो. त्यामुळे सहा नगरसेवकांच्या गणसंख्येनुसार त्यांचा किमान एक सदस्याची वैधानिक तथा विशेष समित्यांवर निवड होते.
काँग्रेस आणि मनसेने गटनेते पदाची निवड केली आहे. उर्वरित पक्षात गटनेतेपदासाठी अनुभवी नगरसेवक इच्छुक असून कोणाची वर्षी लागणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
गटनेत्याला महापौरांच्या अध्यक्षतेखालील गटनेत्यांच्या सभेत स्थान मिळते आणि कोणत्याही विषयासंदर्भात आयुक्त महापौरांच्या वतीने बैठक बोलावून त्यावर प्राथमिक माहितीसह त्याला तत्वत: मंजुरी घेत असतात. त्यामुळे महापालिकेत महापौरांची निवड झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाचा गटनेता हा सभागृह नेता म्हणून कामकाज पाहतो तर विरोधी पक्षांचा गटनेता हा विरोधी पक्षनेता म्हणून कामकाज पाहत असतो.
अन्यमध्ये कोणाची वर्णी?
भाजप : प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर, प्रकाश दरेकर
शिवसेना (ठाकरे) : यशोधर फणसे, विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, मिलिंद वैद्य,सचिन पडवळ
शिवसेना (शिंदे): अमेय घोले, संजय घाडी, तृष्णा विश्वासराव, यामिनी जाधव
एमआयएमआयएम : मोहम्मद जमिर कुरेशी, खैरनुस्सा अकबर हुसेन