पावसाळापूर्व कामांना वेग द्या! नाल्यातील गाळ उपसा, कामांची झाडाझडती

पूर्व उपनगरातील पावसाळी कामांचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी मंगळवारी ‘ग्राऊंड झीरो’वर उतरले. यावेळी भूषण गगराणी यांनी एम. पश्चिम विभाग कार्यालयात भेट देत तेथील विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली.
पावसाळापूर्व कामांना वेग द्या! नाल्यातील गाळ उपसा, कामांची झाडाझडती

मुंबई : वरुणराजाचे आगमन पुढील दोन महिन्यांवर येऊन ठेपले आहे. मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसताच, सखल भाग पाण्याखाली जातात आणि मुंबई महापालिकेवर टीकेची झोड उठते. त्यामुळे ३१ मेपर्यंत नाल्यातील गाळ उपसा करणे, खड्डेमुक्त रस्ते, पावसाळी आजार रोखणे हे मुंबई महापालिकेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाने पावसाळापूर्व कामांना सुरुवात केली असून मिठी नदीसह विविध नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामांना वेग द्या, असे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पालिकेच्या संबंधित यंत्रणांना मंगळवारी दिले. मुंबई महापालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे सुरू असून ही सगळी कामे ३१ मेपर्यंत तडीस नेण्यासाठी गगराणी यांनी मंगळवारी या सगळ्या कामांची ‘ऑन द स्पॉट’ जाऊन झाडाझडती घेतली.

पूर्व उपनगरातील पावसाळी कामांचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी मंगळवारी ‘ग्राऊंड झीरो’वर उतरले. यावेळी भूषण गगराणी यांनी एम. पश्चिम विभाग कार्यालयात भेट देत तेथील विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी केली. यावेळी चेंबूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर चेंबूरस्थित पोस्टल कॉलनी येथील सखल भागात पावसाळी पाणी निचरा करणाऱ्या यंत्रणेची पाहणी केली. तर एल. विभाग अंतर्गत वांद्रे कुर्ला संकुलात मिठी नदीतील गाळ उपसा करण्याच्या कामांची झाडाझडती घेतली. घाटकोपर एन. विभागात लक्ष्मीबाग नाला, एस. विभागातील एपीआय नाला, वीर सावरकर मार्गावरील उषानगर नाला, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता जंक्शनवर भांडुपनजीक बॉम्बे ऑक्सिजन नाला आदी ठिकाणी गगराणी आणि अधिकाऱ्यांनी भेट देऊन नाल्यातून गाळ उपसा करण्याच्या कामांची पाहणी केली. ठिकठिकाणी नाल्यांमधून गाळ उपसण्यासोबत सुरू असलेली संरक्षक भिंत बांधकाम, नाल्याकाठचे अतिक्रमण निर्मूलन, भांडुप आणि नाहूरदरम्यान रेल्वे रुळाखाली सुरू असलेले कल्वर्ट बांधकाम आदींची देखील त्यांनी माहिती जाणून घेत योग्य ते निर्देश दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, उपायुक्त देवीदास क्षीरसागर, उपायुक्त चक्रधर कांडलकर, उपायुक्त रमाकांत बिरादार, उपायुक्त उल्हास महाले, उपआयुक्त देवीदास क्षीरसागर, उपायुक्त विश्वास मोटे, सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर, सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे, सहायक आयुक्त भास्कर कसगीकर, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे आणि इतर संबंधित अधिकारी या दौऱ्यात उपस्थित होते.

पवई तलाव परिसरातील कामांचा आढावा

पवई तलाव आणि परिसराची गगराणी यांनी पाहणी केली. तलाव आणि परिसरात सुरू असलेल्या पर्यावरण संवर्धन उपाययोजनांची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली. तलावाला लागूनच असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये (पवई) देखील फेरफटका मारून त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पवई तलाव येथे गणेश घाट (श्री गणेश नगर विसर्जन घाट) बाजूस भेट देऊन जलपर्णी काढण्याची कामे कशारीतीने सुरू आहेत, तेदेखील त्यांनी प्रत्यक्ष पाहिले.

मिठी नदीतील ५४.५७ टक्के गाळ उपसा फत्ते!

मिठी नदीतील गाळ उपसा करण्याचे दोन वर्षांचे कंत्राट देण्यात येते. दरवर्षी मिठी नदीतील गाळ उपसा करण्याचे काम दोन टप्प्यात म्हणजेच पावसाळ्यापूर्वी ८० टक्के आणि पावसाळ्यात व नंतर २० टक्के असे करण्यात येते. यंदा सुमारे २ लाख ७० हजार मेट्रिक टन इतका गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील टप्पा-१ (पावसाळ्यापूर्वी) मधील गाळ काढण्याची कामे प्रगतिपथावर आहेत. मिठी नदीची टप्पा -१ (पावसाळ्यापूर्वी) मधील गाळ काढण्याची कामे जानेवारी २०२४ पासून सुरू करण्यात आली आहेत. एकूण २ लाख १६ हजार १७४ मेट्रिक टन इतका गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आजमितीस सुमारे १ लाख १७ हजार ९७० मेट्रिक टन (५४.५७ टक्के) इतका गाळ काढण्यात आला आहे. उर्वरित गाळ उपसा करण्याचे काम ३१ मेपर्यंत करण्यात येणार आहे.

जलशुद्धीकरण प्रक्रिया जाणून घेतली!

भांडुप जलशुद्धीकरण संकुलास भूषण गगराणी यांनी मंगळवारी भेट देऊन संकुलाची रचना आणि जलशुद्धीकरण प्रक्रिया यांची माहिती जाणून घेतली. आशिया खंडातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र म्हणून प्रख्यात असलेल्या या संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबईतील प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. भांडुप संकुल येथे १ हजार ९१० दशलक्ष लिटर आणि ९०० दशलक्ष लिटर पाणी शुद्धीकरण करणारे दोन युनिट्स आहेत.

logo
marathi.freepressjournal.in