

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम, सायन, नायर धर्मादाय आणि नायर दंत अशा प्रमुख रुग्णालयांतील सहाय्यक अभियंत्यांकडे उपनगरीय रुग्णालयांतील तांत्रिक कामांचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. हा पदभार संबंधित प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता, संचालक (आरोग्य) आणि उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहे. मात्र, या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्याची मागणी बृहन्मुंबई म्युन्सिपल मजदूर इंजिनिअर्स युनियनच्यावतीने करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेतील रुग्णालयांमध्ये अभियांत्रिकी पदांच्या नियुक्त्या आणि बदलीची जबाबदारी नगर अभियंता कार्यालयाकडे असते. उपनगरीय रुग्णालयांमध्ये अभियंत्यांची कमतरता असल्यास, त्याबाबत संबंधित रुग्णालयांनी प्रथम नगर अभियंता तसेच प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांच्याकडे मागणी करणे अपेक्षित होते. मात्र ही प्रक्रिया न पाळता प्रमुख रुग्णालयांतील अभियंत्यांना अतिरिक्त जबाबदारी देण्यात आल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
के.ई.एम., सायन आणि नायरसारख्या मोठ्या रुग्णालयांमध्ये प्रचंड तांत्रिक कामकाज केले जातात. यामध्ये दैनंदिन दुरुस्ती, उपकरणांची देखभाल, नव्या सुविधांची उभारणी, इमारतींची दुरुस्ती यांसह अनेक कामांचा मोठा व्याप या रुग्णालयांवर आहे. अशातच पूर्व व पश्चिम उपन-गरांतील रुग्णालयांची दुरुस्ती व परिरक्षणाची जबाबदारीही त्याच अभियंत्यांवर टाकल्याने मुख्य रुग्णालयांतील कामकाजावर परिणाम होण्याची भीती युनियनच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई म्युन्सिपल मजदूर इंजिनिअर्स युनियनच्यावतीने आयुक्ताना विनंती करण्यात आली आहे की उपनगरीय रुग्णालयांसाठी स्वतंत्र सहाय्यक अभियंत्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश नगर अभियंता विभागाला द्यावेत. तसेच प्रमुख रुग्णालयांतील अभियंत्यांवर अतिरिक्त भार टाकणारे वादग्रस्त परिपत्रक रद्द करण्याबाबत संबंधित रुग्णालय व्यवस्थापनास कळविण्यात यावे.