मुंबईत २१६ इमारती अतिधोकादायक

९७ इमारती पावसाळ्यात असुरक्षित; ११० इमारत संबंधित प्रकरणे न्याय प्रविष्ट
मुंबईत २१६ इमारती अतिधोकादायक

मुंबईत आजही ब्रिटीशकालीन इमारती असून, इमारतींची सद्यस्थितीत काय यासाठी मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करते. यंदाच्या सर्वेक्षणातून २१६ अतिधोकादायक इमारती असल्याचे निदर्शनास आले आहे. यात ९७ इमारती डेंजर झाल्या असून, या इमारती पावसाळ्यापूर्वी खाली करणे मुंबई महापालिका प्रशासनासमोर आव्हानात्मक काम आहे.‌ दरम्यान, २१६ अतिधोकादायक इमारतींपैकी ११० इमारतीश संबंधित प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करते. यंदाच्या सर्वेक्षणात २१६ इमारतींचे सर्वेक्षण केले असता सर्वाधिक ११४ इमारती पश्चिम उपनगरातील आहेत. तर, शहर भागातील ३६ आणि पूर्व उपनगरातील ६६ इमारतींचा यामध्ये समावेश आहे. जोरदार पावसात अशा अतिधोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. अनेक रहिवासी इमारती रिकाम्या करण्यास टाळाटाळ करतात. काहीजण न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवण्यासाठी धाव घेत असल्याने अशा इमारती त्याच स्थितीत राहतात. त्यामुळे महानगरपालिकेने धोकादायक इमारती पाडण्यासाठी सुनिश्चित कार्यपद्धती सुरू केली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षापूर्वी ६१९ अतिधोकादायक आढळलेल्या इमारतींची संख्या आता कमी झाली आहे. यातील काही इमारती पाडून टाकण्यात आल्या आहेत; मात्र अजूनही २१६ इमारती अतिधोकादायक इमारती आहेत.

'अशी' केली जाते इमारतींची श्रेणी

मुंबईतील जुन्या इमारतींचा सर्व्हे केला जातो. त्यात सी-१, सी -२ आणि सी-३ अशी कॅटेगरी केली जाते. सी-१ मध्ये आलेल्या इमारती अतिधोकादायक मानल्या जातात. सी-२ यादीत असलेल्या इमारतींच्या स्ट्रक्चरला रिपेअरची गरज असते, तर सी-३ इमारतींमध्ये किरकोळ दुरुस्ती आवश्यक असते. नियमानुसार रहिवाशांना नोटिस बजावून सात दिवसांच्या आत इमारत रिकामी करण्याचे प्रशासनाला आदेश दिले जातात.

अतिधोकादायक इमारती ओळखा!

-इमारतीच्या आर.सी.सी. फ्रेम कॉलम, स्लॅब इत्यादीच्या रचनेत कॉलम झुकल्यासारखे दिसणे.

-इमारतीचे बीम झुकल्यासारखे दिसणे आणि इमारतीचा स्लॅब झुकल्यासारखा आढळणे.

-इमारतीचा तळ मजल्याचा भाग खचल्यासारखा दिसणे.

-इमारतीच्या कॉलममधील भेगा वाढत असल्याचे दिसून येणे.

-इमारतीच्या कॉलममधील काँक्रिट पडत असल्याचे दिसणे.

-इमारतीच्या कॉलमचा भाग फुगल्यासारखे दिसणे.

-इमारतीचा आर.सी.सी. चेंबर्स (कॉलम, बीम) व विटांची भिंत यात सांधा / भेगा दिसणे.

-स्लॅबचे किंवा बीमचे तळ मजल्याचे काँक्रिट पडत असल्याचे दिसणे.

logo
marathi.freepressjournal.in