दुकानांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या लावाच! पालिकेकडून झाडाझडती; ३००० दुकानांना नोटिसा

दुकानांच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे दिसतील, अशा मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी असोसिएशनला दिलेली मुदत संपुष्टात आली आहे.
दुकानांच्या प्रवेशद्वारावर मराठी पाट्या लावाच! पालिकेकडून झाडाझडती; ३००० दुकानांना नोटिसा

मुंबई : दुकानांच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे दिसतील, अशा मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्यापारी असोसिएशनला दिलेली मुदत संपुष्टात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने ८७ हजार ४७ दुकानांची तपासणी केली असता ३,०४० दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून २,११६ जणांना न्यायालयात खेचण्यात आले आहे.

मराठी पाट्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे दिसतील अशा लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मार्च २०२२ ला दुकाने-आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेत आणि ठळकपणे लिहिण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी २०१८ च्या निर्णयानुसार १० किंवा १०पेक्षा जास्त कामगार अससेल्या दुकानांवर मराठी पाट्या असणे बंधनकारक होते. मात्र नव्या नियमानुसार कर्मचाऱ्यांची संख्या कितीही असली तरी फलक मराठी भाषेतच असणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार दुकाने किंवा आस्थापनांवरील पाट्या मराठीत लावण्यासाठी देण्यात आलेली अखेरची मुदत २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपल्यानंतर पालिकेच्या दुकाने-आस्थापने विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये सर्व २४ वॉर्डमध्ये दोन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे.

सात लाख दुकानांना निर्देश

मुंबईत सुमारे सात लाख दुकाने-आस्थापने आहेत. या सर्वांना हा नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे. पालिकेच्या तपासणीत मराठी पाटी नसल्यास कारवाई करण्यात येईल.

३० लाखांचा दंड वसूल

पालिकेने आतापर्यंत केलेल्या कारवाईत ३० लाख ३७ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. कोर्टाच्या निर्देशांमुळे ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे.

असा आहे दंड

मराठी पाटी नसल्यास कायद्यानुसार प्रति कामगार दोन हजार याप्रमाणे जास्तीत जास्त एक लाखापर्यंतचा दंड होणार आहे, तर वारंवार दुर्लक्ष करणाऱ्यांकडून प्रतिदिन दोन हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in