पावसाळ्यापूर्वीच BMC ॲक्शन मोडमध्ये; यंदा पावसाळ्यात पाणी उपसा करण्यासाठी ४८१ पंप

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत पाणी साठू नये यासाठी पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
पावसाळ्यापूर्वीच BMC ॲक्शन मोडमध्ये; यंदा पावसाळ्यात पाणी उपसा करण्यासाठी ४८१ पंप

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत पाणी साठू नये यासाठी पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईतील सखल भागात पाणी साचल्यास तातडीने उपसा करण्यासाठी तब्बल ४८१ पंप बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांना दिलासा मिळेल, हीच अपेक्षा.

मुंबईत अनेकवेळा ताशी ५५ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडतो. या वेळी समुद्राला भरती असली तर सखल भागात पाणी साचते. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरातील पाणी साचण्याची ठिकाणे शोधण्याची कार्यवाही विभाग पातळीवरील कर्मचारी आणि पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत प्रतिवर्षाप्रमाणे करण्यात आली आहे. या पंपांच्या ठिकाणी ऑपरेटर आणि मदतनीस असे मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. गरजेनुसार पंप वेळेत सुरू होतील आणि योग्य पद्धतीने कार्यरत राहतील याची जबाबदारी विभागीय पातळीवर सोपविण्यात येणार आहे. विभागातील सहाय्यक अभियंते अर्थात समन्वय अधिकारी हे आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील समन्वयकाकडे या पंपच्या कामगिरीची माहिती वेळोवेळी देणार आहेत. त्यामुळे जोरदार पावसावेळी पंपांनी किती तास पाणी उपसा केला यावर लक्ष ठेवणे देखील शक्य होणार आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार हे काम सुरू आहे.

अशी होतेय कार्यवाही

- २०२२ मध्ये ३८० पंप बसविण्याचे निश्चित करण्यात आले होते; मात्र, विभागांच्या मागणीनुसार ५५ अतिरिक्त म्हणजेच एकूण ४३५ पंप बसविण्यात आले होते.

- २०२३ मध्येदेखील पाणी उपसा करणारे ३८० पंप बसविण्याचे नियोजन करण्यात आले होते. वाढीव मागणीनंतर ११२ अतिरिक्त पंपांसह एकूण ४९२ पंप कार्यान्वित होते.

- यंदा २०२४ मध्ये २५ प्रशासकीय विभाग आणि केईएम रुग्णालय, लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या मागणीनुसार विविध ठिकाणांवर ४८१ पंप बसविण्याचे नियोजन आहे.

असे बसवणार पंप

मुंबई शहर भाग - १८७ पंप

पश्चिम उपनगर - १६६ पंप

पूर्व उपनगर - १२४ पंप

logo
marathi.freepressjournal.in