प्रभारी झाले कायम अभियंता, १५ मुख्य अभियंत्यांना पदोन्नती

प्रभारी म्हणून गेली दोन वर्षे जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रभारी अभियंता आता कायम अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रभारी झाले कायम अभियंता, १५ मुख्य अभियंत्यांना पदोन्नती
Published on

मुंबई : प्रभारी म्हणून गेली दोन वर्षे जबाबदारी पार पाडणाऱ्या प्रभारी अभियंता आता कायम अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पालिकेच्या १५ प्रभारी अभियंत्यांना पदोन्नती दिल्याने कोस्टल रोड, रस्ते व वाहतूक, पर्जन्य जलवाहिन्या, जलअभियंता विभाग, पाणी पुरवठा प्रकल्प यासह महत्त्वाच्या विभागांना कायम अभियंता मिळाले आहेत. दरम्यान, पालिकेच्या पदोन्नती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेत दोन वर्षांपासून प्रशासकीय राज्य आहे. प्रशासकीय राजवटीत दोन वर्षांपासून १५ विभागातील प्रमुख अभियंता पदाच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. दोन वर्षांपासून प्रभारी म्हणून १५ विभागाच्या जबाबदारी पार पाडत होते. ही पदे कायम करण्याची मागणी अभियंता संघटनांनी वारंवार लावून धरली होती. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत होते. पालिकेचे सेवानिवृत्त उपायुक्त उल्हास महाले यांना एक वर्षासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करणारे पत्र पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिं चहल यांनी राज्य सरकारला पाठवले आहे. मात्र मुख्य अभियंत्यांच्या नेमणुका रखडल्याबाबत प्रशासन कोणतीही हालचाल करत नसल्याने पालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. त्याची दखल घेत प्रशासनाने रखडलेल्या प्रभारी पदावरील अधिकाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.

या नेमणुकांमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील ११ आणि यांत्रिक व विद्युत विभागातील ४ उपप्रमुख अभियंत्यांना बढती देण्यात आली आहे. प्रभारी प्रमुख अभियंतापदाचा प्रभारी भार सोपवलेल्या तीन अधिकाऱ्यांकडील पदाचा भार काढून घेत त्यांच्याकडे उपप्रमुख अभियंतापदाची जबाबदारी सोपवली आहे, तर नगर अभियंता, पूल विभाग आणि यांत्रिक व विद्युत विभागाच्या उपप्रमुख अभियंत्यांचा प्रमुख अभियंता पदासाठी आवश्यक असलेला कालावधी पूर्ण न झाल्याने त्यांना बढती देण्यात आलेली नाही. त्यांच्याकडे या खात्यांचा प्रभारी मुख्य अभियंता म्हणून भार कायम ठेवण्यात आला आहे.

या विभागात पदोन्नती!

विकास व नियोजन विभाग - सुनील राठोड, इमारत देखभाल विभाग - यतीन दळवी, नागरी प्रशिक्षण केंद्र - गोंविद गारुळे, रस्ते व वाहतूक विभाग - मनिष पटेल, कोस्टल रोड - गिरीष निकम, पर्जन्य जलवाहिनी - श्रीधर चौधरी, जलअभियंता विभाग - पुरुषोत्तम माळवदे, पाणी पुरवठा प्रकल्प - पांडुरंग बंडगर, मलनिःसारण प्रकल्प - शशांक भोरे, मुंबई मलनिःसारण प्रकल्प : राजेश ताम्हाणे, मलनिःसारण प्रचालन - प्रदीप गवळी, घनकचरा व्यवस्थापन - प्रशांत तायशेटे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प - सुधीर परकाळे, दक्षता विभाग - अविनाश तांबेवाघ यांना कायम करण्यात आले असून नगर अभियंता - दिलीप पाटील, पूल विभाग - विवेक कल्याणकर आणि यांत्रिक व विद्युत विभाग - कृष्णा पेरेकर यांच्याकडे प्रभारी म्हणून जबाबदारी ठेवण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in