
मुंबई : मुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्लास्टिकविरोधी मोहीम तीव्र केली आहे. पालिकेने एकाच दिवसात १ हजार १४५ आस्थापनांना भेटी दिल्या आहेत. त्यात २९ प्रकरणांमध्ये मिळून सुमारे ६१.५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. प्लास्टिकविरोधी मोहीम यापुढे देखील तीव्र गतीने सुरू राहणार आहे, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
उपायुक्त (विशेष) चंदा जाधव म्हणाल्या की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना, अनुज्ञापन आणि बाजार खाते विभागाच्या पथकांनी संपूर्ण मुंबई महानगरात प्रतिबंधात्मक प्लास्टिकविरोधातील कारवाई सुरू केली आहे. दिनांक १ जानेवारी २०२५ ते दिनांक १९ जानेवारी २०२५ या कालावधीत ५ हजार ७८३ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात ११८ प्रकरणांमध्ये मिळून सुमारे १६७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. सोमवार २० जानेवारीला एकाच दिवसात १ हजार १४५ आस्थापनांना भेटी देण्यात आल्या. त्यात २९ प्रकरणांमध्ये मिळून सुमारे ६१.५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे. यापुढच्या काळात देखील ही कारवाई वेगाने सुरू राहणार आहे.
प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळा
मुंबईकर नागरिकांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केल्याप्रमाणे प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) करू नये. कायद्याचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त (विशेष) चंदा जाधव यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने केले आहे.