मुंबई : मुंबईतील रस्ते सिमेंट कॉँक्रीटचे करण्यात येत असून, रस्ता तयार झाल्यानंतर पुन्हा खोदकाम करण्यास पालिकेने मनाई केली आहे. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पालिकेने कठोर नियमावली जारी केली असून नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, चकाचक रस्त्यांसाठी 'डक्ट पॉलिसी’ आणणण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत २०५० किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्ती करण्यासाठी पालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. तरीही मुंबईतील रस्ते खड्डेमय होतात. खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्ते सिमेंट कॉँक्रीटचे करण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले. त्यानंतर खड्डेमुक्त रस्त्यांसाठी सर्व रस्ते सिमेंटचे करण्याचे धोरण आखून कार्यवाही सुरू आहे. पालिकेच्या रस्त्याखालून ड्रेनेज लाईन, एसडब्ल्यूडीच्या लाईन, टेलिफोन, पॉवर केबल, ऑप्टिकल फायबर लाइन रस्त्याच्या पृष्ठभागाखाली आहेत. या युटिलिटीमध्ये ज्यावेळी बिघाड होते तेव्हा दुरुस्तीसाठी रस्ते खोदावे लागतात आणि रस्त्यावर पुन्हा खड्डे पडतात. हे टाळण्यासह मुंबईकरांना दर्जेदार वाहतूक व्यवस्था देण्यासाठी ‘डक्ट पॉलिसी’ राबवली जाणार असल्याचे पालिकेच्या रस्ते विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
सिमेंट रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे गुगल लोकेशन
काँक्रीटीकरण करण्याच्या रस्त्यांची यादी आणि त्यांचे गुगल लोकेशन ऑनलाईन प्रसिद्ध करावे लागणार आहे आणि सार्वजनिक सूचना देऊन सर्व नागरिकांना विनंती करून पाणी, गटार दुरुस्तीचे नवे कनेक्शन घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम करावे. रस्ता सुधारणा कामासोबत संबंधित विभागात पथदिव्यांची सुविधा करणे. कामाशी संबंधित असणाऱ्या साइट अभियंत्यांनी सर्व युटिलिटी डक्टमध्ये सामावून घेतली जातील, याची खबरदारी घ्यावी.
अशी आहे ‘डक्ट पॉलिसी’
-कॉँक्रीट रस्त्याच्या कामात ह्युम पाइप टाकण्याला बंदी
-रस्त्याच्या कडेला ५० मीटरपर्यंत आरसीसी डक्ट टाकणे
-रस्त्याच्या खालून केबल टाकण्यासाठी सुविधा करणे
-केबल कनेक्शन असल्यास स्टब वॉटर मेनने बदलावे
-सर्व प्लॉटच्या सीमेवर रस्त्याच्या कडेला स्टब वॉटर मेन देणे
-सर्व भूखंडांच्या सीमांना गटार रस्त्यांची जोडणी द्यावी
-रस्त्याची दुरुस्ती करण्याआधी विभागाची योग्य समन्वय