दिवाळीपूर्वी मुंबई धूळ मुक्त; पालिकेची विशेष मोहीम, ९ दिवसांत प्रमुख रस्त्यांची स्वच्छता

वायू प्रदूषण रोखण्यासह धुळ मुक्त मुंबई यासाठी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवाळीपूर्वी मुंबई धूळ मुक्त; पालिकेची विशेष मोहीम, ९ दिवसांत प्रमुख रस्त्यांची स्वच्छता
दिवाळीपूर्वी मुंबई धूळ मुक्त; पालिकेची विशेष मोहीम, ९ दिवसांत प्रमुख रस्त्यांची स्वच्छता
Published on: 

मुंबई : वायू प्रदूषण रोखण्यासह धुळ मुक्त मुंबई यासाठी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. २९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या नऊ दिवसांच्या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते, पदपथ, दुभाजक आणि धूळ साचणाऱ्या ठिकाणांची स्वच्छता करण्यावर भर दिला जाणार असून या मोहिमेसाठी प्रत्येक प्रभागाला १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईतील प्रमुख वाहतूक मार्गांसह धूळप्रवण रस्त्यांची स्वच्छता करून हवेची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर), सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर), बीकेसी कनेक्टर, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांसह इतर महत्त्वाच्या रस्त्यांचा समावेश आहे.

कामाचा रोज आढावा; छायाचित्रांसह नोंद

मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळांच्या उपायुक्तांनी प्रत्यक्ष लक्ष घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालन पथकाकडून मोहिमेची प्रगती मध्यवर्ती स्तरावर संकलित केली जाणार आहे. कोणत्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली, किती यंत्रसामग्री वापरण्यात आली आणि किती कचरा व गाळ गोळा करण्यात आला, याची नोंद ठेवली जाणार आहे. तसेच कामापूर्वी आणि कामानंतरची छायाचित्रे भौगोलिक स्थानाच्या नोंदीसह (जिओ-टॅगिंग) संकलित केली जाणार आहेत. या मोहिमेची पडताळणी केलेली माहिती वेळोवेळी प्रसारमाध्यमांना देऊन नागरिकांनाही कामाची प्रगती आणि परिणामांची माहिती कळविण्याचे निर्देश जनसंपर्क अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करून प्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांचा प्रत्यक्ष परिणाम दिसून यावा, हा या मोहिमेचा उद्देश आहे.

धूळ नियंत्रणाच्या उपाययोजना

मोहिमेदरम्यान रस्त्यांवर साचलेली धूळ, गाळ आणि बांधकाम व पाडकामातील राडारोडा हटवण्यात येणार आहे तसेच रस्त्यांचे दुभाजक, मधले पट्टे, पदपथ आणि रस्त्यांच्या कडांची स्वच्छता केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार रस्त्यांवर पाणी शिंपडणे आणि मिस्टिंगद्वारे धूळ नियंत्रणाच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

कृती आराखडा तयार करणार

कामासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करण्याचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभागातील सहाय्यक अभियंत्यांना देण्यात आले आहेत. संबंधित विविध विभागांनी आपल्या सहाय्यक आयुक्तांशी समन्वय साधून दिवसनिहाय कृती आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in