२५ मेपर्यंत थकित रक्कम भरा, अन्यथा मालमत्ता सील; BMC आयुक्तांचा आदेश : मालमत्ता करवाढीच्या नवीन स्त्रोतांसाठी शोध घ्या
मुंबई : उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता करवाढीसाठी पालिकेच्या २५ वॉर्डातील मालमत्तांचा शोध घ्या. तसेच मालमत्तेतील बदलानुसार कर निर्धारणात सुधारणा करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी पालिकेच्या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षांत ४ हजार ५०० कोटींचे उद्दिष्ट असून १० मेपर्यंत ३ हजार ९०५.५२ कोटींचा कर जमा झाला आहे. दरम्यान, थकीत रक्कम भरण्यासाठी २५ मे अखेरची मुदत असून त्या दिवसापर्यंत थकीत रक्कम न भरल्यास मालमत्ता जप्त करत सील करण्यात यावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
जकात कर बंद झाल्यानंतर मालमत्ता कर हा पालिकेचा उत्पन्नाचा स्त्रोत राहिला आहे. त्यामुळे उद्दिष्टानुसार थकित मालमत्ता कर संकलनासाठी पालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. फेब्रुवारी महिन्यात देयके पाठवल्याने २५ मेपर्यंत कर भरणा करण्याची मुदत पालिकेने दिली आहे. या मुदतीआधी कर भरणा न करणाऱ्या विशेषत: मोठ्या मालमत्ताधारकांवर कठोर दंडात्मक कारवाई तसेच जप्ती व सील कारवाई केली जाणार आहे.
हा मालमत्ता कर नागरिकांनी वेळेत महानगरपालिकेकडे जमा करावा, यासाठी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, यांच्यासोबत शुक्रवारी महानगरपालिका मुख्यालयात बैठक पार पडली. यावेळी कर भरणा न करणाऱ्या मालमत्ताकरांची वसूली न झाल्यास जप्त केलेल्या वस्तूचा जाहीर लिलाव करण्याच्या प्रक्रियेस वेग द्यावा, त्यानंतर मालमत्तेची जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याची कार्यवाही सुरू करावी, तसेच दंडात्मक कारवाई करावी असे निर्देश आयुक्त गगराणी यांनी यावेळी दिले. अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) महेश पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
आतापर्यंत ३ हजार ९०५ कोटींचे करसंकलन
करसंकलनाचे २०२३-२४ चे निर्धारित उद्दिष्ट ४ हजार ५०० कोटी रूपयांचे असून गुरूवार, ९ मे २०२४ अखेर ३ हजार ९०५.५२ कोटी रूपयांचे करसंकलन झाले आहे. उर्वरित १५ दिवसात ५९५ कोटी रुपयांच्या मालमत्ताकर संकलनाचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने बैठकीत चर्चा करण्यात आली. नागरिकांनी मुदतीपूर्वी त्यांच्या मालमत्तासंबंधी कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तीन मालमत्तांच्या जप्तीची कारवाई
सातत्याने आवाहन करत आणि पाठपुरावा करूनही मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन मालमत्ताधारकांवर पालिकेने जप्तीची कारवाई केली आहे. या मालमत्तांमध्ये ‘पी उत्तर’ विभागातील २ भूखंड आणि ‘एफ उत्तर’ विभागातील एका भूखंडाचा समावेश आहे. या तीनही मालमत्ताधारकांकडे एकूण ०६ कोटी ७३ लाख २० हजार ९३१ हजार रुपयांची कर थकबाकी आहे.