

मुंबई : पुण्यातील मोशी येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील सर्व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांबाबत एसओपी तयार करण्यासह सुरक्षा ऑडिट करणे आदी कठोर भूमिका घेतली आहे.
अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा (पश्चिम उपनगरे) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत सर्व प्रकल्पांचे सुरक्षा ऑडिट, पावसाळी तयारी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प) अविनाश काटे, संबंधित अधिकारी, प्रकल्प सल्लागार तसेच विविध घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांचे कंत्राटदार यावेळी उपस्थित होते.
कांजूरमार्ग, देवनार आणि मुलुंड येथील प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या बायोमायनिंग उत्खनन पद्धतींचा फेरआढावा घेण्याचे आदेश देण्यात आले. तसेच अस्थिर उत्खनन क्षेत्रे ओळखून तेथे बॅरिकेडिंग करणे, अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश देणे आणि येणाऱ्या-जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद ठेवणे अनिवार्य करण्यात आले.
देवनार वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प आणि लेगसी कचरा क्षेत्रातील आग व मिथेन गॅसच्या धोक्याचे पुनर्मूल्यांकन करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याचे आदेशही देण्यात आले. आरडीएफ साठ्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य आगीच्या धोक्याबाबत कंत्राटदारांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले असून सर्व कर्मचाऱ्यांसाठी नियमित मॉक ड्रिल घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय, मुख्य अभियंता आणि उपमुख्य अभियंत्यांना आठवडाभरात सर्व प्रकल्पांना भेट देऊन सुरक्षा नियम व कार्यपद्धतींच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बैठकीच्या शेवटी अतिरिक्त आयुक्तांनी ‘सुरक्षितता ही केवळ औपचारिकता नसून प्रकल्पाच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य भाग असला पाहिजे,’ असे स्पष्ट करण्यात आले.
स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकल्पांसाठी स्वतंत्र प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लँडफिलवरील कचऱ्याची उंची निर्धारित मर्यादेत ठेवणे, शेड, वर्कशॉप, कंटेनर आदी संरचनांचे स्थैर्य परीक्षण करणे तसेच पावसाचे पाणी आणि पृष्ठभागावरील निचरा व्यवस्थेचे सर्वंकष ऑडिट करण्यावर भर देण्यात आला.