

मुंबई : मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी मुंबईत जलाशय बांधण्यात आले आहेत. मालाड येथे ४१ वर्षे जुना टेकडी जलाशय असून त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तातडीने मालाड जलाशयाची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी मुंबई पालिका तब्बल ८ कोटी रुपये खर्च करणार आहे. दुरुस्तीसाठी ८ कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा नवीन जलाशय बांधले जाऊ शकते, या मुद्द्यावरुन बुधवारी स्थायी समितीत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेकडून मालाड परिसरातील विविध भागांना मालाड जलाशयातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मालाड टेकडीवरील हा जलाशय-२ हा सन १९८४ मध्ये बांधण्यात आला होता. याची पाणीसाठा करण्याची क्षमता सुमारे १८.१४ दशलक्ष लिटर आहे. हा जलाशय ४० वर्षांपेक्षा अधिक जुना झाल्यामुळे त्यांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. महापालिकेच्या तांत्रिक सल्लागारांच्या सूचनेनुसार जल अभियांत्रिकी विभागामार्फत जलाशय तसेच त्यासंबंधित नियंत्रण कक्ष क्रमांक १ व २ यांचे संरचनात्मक लेखापरीक्षण अर्थात स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले. या तपासणीच्या अहवालानुसार जलाशय आणि नियंत्रण कक्षांची तातडीने व्यापक संरचनात्मक दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे पाणी पुरवठा प्रकल्प खात्यामार्फत याच्या दुरुस्तीच्या कामासाठी सल्लागाराच्या सूचेनेनुसार निविदा मागवण्यात आली होती. या निविदेमध्ये देव इंजिनिअरींग ही कंपनी पात्र ठरली आहे. या कामांसाठी सुमारे आठ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. जलाशय व नियंत्रण कक्षांच्या दुरुस्तीमुळे मालाड परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून हे काम पुढील १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केले जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.