
मुंबई : माहीम येथील न्यू माहीम शाळेच्या बांधकामाला धोकादायक ठरवून पालिकेने सदर शाळा बंद करण्याचा घाट घातला असतानाच भांडुपमध्ये १९७१ सालापासून सुरू असलेली खिडींपाडा येथील महानगरपालिकेची मराठी शाळा आता बंद झाली आहे. त्यामुळे या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नाइलाजास्तव खासगी शाळेत प्रवेश घ्यावा लागला आहे. दरम्यान, महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शाळा बंद झाल्याचा आरोप आमदार संजय उपाध्याय यांनी केला असून या शाळेची पुनर्बांधणी करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
भांडुप खिंडीपाडा येथे महानगरपालिकेने १९७१ साली जिल्हाधिकाऱ्यांच्या जागेत सदर शाळा बांधली होती. पण अनेक वर्षांपासून शाळेची डागडुजी, रंगरंगोटी न झाल्याने इमारत अत्यंत जीर्ण झाली होती. याबाबत अनेक सामाजिक संस्थांनी पाठपुरावा करूनही शाळेकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शाळा बंद पडली असल्याचा आरोप उपाध्याय यांनी केला आहे.
राज्य शिक्षक परिषदेने आमदार संजय उपाध्याय यांना २४ जुलै रोजी पत्रव्यवहार करत सदर शाळेची माहिती देत, संबंधित शाळेची पुनर्बांधणी तातडीने पूर्ण करून शाळा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र शिक्षक परिषदेचा आरोप
शाळा धोकादायक घोषित झाल्यानंतर ही शाळा मूळ ठिकाणापासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या तूळशेत पाडा या शाळेत स्थलांतरित करण्यात आली. शाळेत बालवाडीसह ८० विद्यार्थी शिकत होते. मात्र, एवढ्या दूर पाठवण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्याने पालकांनी विद्यार्थ्यांना खासगी शाळेत शिक्षणासाठी पाठवले. परिणामी, विद्यार्थीच नसल्याने खिंडीपाडा मनपा मराठी शाळा बंद झाली, असा आरोप महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केला आहे.