

मुंबई : मुंबईचा महापौर कोण? हे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत भाजपने गुलदस्त्यात ठेवले असून शनिवारी सकाळी महापौरपदाचा चेहरा उघड होणार आहे. मात्र भाजपची कुठली महिला महापौर असणार याची उत्सुकता भाजपच्या सहयोगी पक्षासह विरोधकांना लागली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापौरपदावर ठाकरे सेनेने दावा केला असून माजी महापौर श्रद्धा जाधव, विशाखा राऊत यांची नावे चर्चेत आहेत.
मुंबई महापालिकेत यंदा महिला आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर महिला असणार आहे. त्यात भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आले असून शिंदेसेनेचे २९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महायुतीचा महापौर होणार हे निश्चित झाले आहे. भाजपच्या राजश्री शिरवडकर, रितू तावडे, योगिता कोळी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र महापौरपदाचा चेहरा कोण? हा पत्ता भाजप आज (शनिवारी) सकाळी जाहीर करणार आहे. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप मोठा भाऊ ठरला असून तीन दशकांनंतर भाजपच्या हाती मुंबई महापालिकेची चावी आली आहे. गेली ३ दशके ठाकरे सेनेसोबत भाजपही सत्तेत होती. मात्र दोन्ही मित्रपक्षांमध्ये एकता नव्हती. २०२२ मध्ये भाजप व ठाकरे सेना स्वतंत्र झाले आणि २०२६ च्या निवडणुकीत भाजप मोठा भाऊ ठरला आहे. त्यात शुक्रवारी भाजपला पालिका मुख्यालयात पक्ष कार्यालय मिळाले असून शुक्रवारी सत्यनारायणाची पूजा ठेवण्यात आली होती. यावेळी भाजपच्या पक्ष कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकृतीची रांगोळी काढण्यात आली असून मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात, असा संदेश रांगोळीतून देण्यात आला आहे.