मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी २८ जानेवारीपर्यंत आपले अर्ज पालिकेच्या चिटणीस विभागाकडे दाखल करायचे आहेत. तर ३१ जानेवारीला महापौर व उपमहापौराची निवड होणार आहे. यंदा मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे पीठासीन अधिकारी असणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदासाठी आणि त्यानंतर नवनिर्वाचित महापौर यांच्या अध्यक्षतेखाली उप महापौर पदासाठी निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीबाबतचा अजेंडा शनिवारी पक्षनिहाय, अपक्ष अशा प्रत्येक विजयी उमेदवाराच्या म्हणजेच २२७ विजयी उमेदवारांना घरपोच करण्यात येणार आहे.
सर्वात जास्त संख्याबळ असलेल्या राजकीय पक्षाकडून जेव्हा २८ जानेवारी रोजी महापौर, उप महापौर पदासाठी अर्ज भरायचे असतील. त्याबाबत सर्वच विजयी उमेदवारांना अगोदरच माहिती मिळणार आहे. त्यामुळे इतर पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार महापौर आणि उप महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आपले अर्ज दाखल करू शकणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या इतिहासात गेल्या २५ वर्षात तरी प्रथमच आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदाची निवडणूक होणार आहे. वास्तविक, महापालिकेच्या एकूण पाच वर्षांच्या कालावधीत अडीच वर्षांनी महापौर पदासाठी निवडणूक घेण्यात येते. त्यावेळी मावळत्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली नवीन महापौर पदासाठी निवडणूक घेण्यात येत होती. मात्र ७ मार्च २०२२ रोजी
महापालिकेची पाच वर्षांची मुदत संपुष्टात आल्यानंतर काही कारणास्तव जवळजवळ सलग चार वर्षे महापालिकेची निवडणूक झाली नाही. ती निवडणूक न्यायलाच्या आदेशानंतर १५ जानेवारी रोजी पार पडली. तसेच, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित झाला. मात्र आता नवीन महापौरांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांमधून ज्येष्ठ नगरसेवकांना पीठासन अधिकारी म्हणून नेमले जाते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदाची निवडणूक घेण्यात विजयी
येते, अशी कार्यपद्धती होती. मात्र नवीन निवडणुकीसाठी चार वर्षांचा कालावधी गेला असून पीठासन अधिकारी म्हणून विरोधी पक्षातील (शिवसेना ठाकरे) ज्येष्ठ नगरसेवकांना अधिकार दिल्यास त्यास सत्तेवर येणारे भाजप पक्षाकडून विरोध होणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच कदाचित प्रधान सचिव दर्जाचे सनदी अधिकारी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली यंदाची महापौर निवडणूक पार पडणार आहे. तसा सुधारित अध्यादेश काढ्यात आल्याचे सांगण्यात येते.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या. १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर झाले. त्यामुळे साहजिकच आता महापौर आणि उप महापौर पदासाठी निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्याची प्रक्रिया सर्व महापालिकांत सुरू झाली आहे. त्यानुसार, ३१ जानेवारी रोजी नवीन महापौर पदासाठी मुंबई महापालिकेच्या मुख्य सभागृहात दुपारी १२ वाजता निवडणूक घेण्याचे नियोजन आहे.
पीठासन अधिकारी आयुक्त भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली महापौर पदासाठी निवडणूक पार पडल्यावर नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक घेतील.
त्यानंतर, महापौरांकडे या निवडणुकीत ज्या ज्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले, त्यांची संख्या याची यादी महापालिका चिटणीस यांच्याकडून सादर होईल आणि ती सभागृहाच्या पटलावर मांडण्यात येईल. त्यामुळे या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार अधिकृतपणे नगरसेवक झाल्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे.
इन कॅमेरा प्रक्रिया होणार
महापौर पदासाठी महापालिका आयुक्त हे पीठासीन अधिकारी असणार आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही महापालिका चिटणीस विभागामार्फत इन कॅमेरा होणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहणार आहे.