BMC Mayor : रितू तावडे मुंबईच्या महापौर; संजय घाडी उपमहापौर, दोन्ही निवडी बिनविरोध
मुंबई : भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांनी महापौरपदासाठी, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक संजय घाडी यांनी उपमहापौरपदासाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि काँग्रेसने महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवार उतरवलाच नाही. त्यामुळे महापौर व उपमहापौरपदाची निवड आता बिनविरोध होणार हे निश्चित आहे. पालिकेच्या नियमानुसार ११ फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौरपदाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा पालिका सभागृहात करण्यात येणार आहे.
दरम्यान, संजय घाडी यांचे उपमहापौरपद सव्वा वर्षांसाठी असून त्यानंतर नवीन उपमहापौर शिंदेसेनेकडून घोषित करण्यात येणार आहे. हिंदू महापौर असा गाजावाजा भाजपने केला होता, परंतु आता मराठी महापौर दिला असून मराठी माणसासाठी अपशकून नको म्हणून ठाकरे सेनेने महापौरपदासाठी उमेदवार उभा केलेला नाही, असे ठाकरे सेनेच्या माजी महापौर पालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले.
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेतील महापौरपदासाठी घाटकोपर विभागातील प्रभाग १३२ मधून विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेविका रितू तावडे यांच्या नावाची घोषणा भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केली, तर शिवसेनेने (शिंदे) उपमहापौरपदासाठी प्रभाग क्रमांक ५ मधून विजयी झालेले संजय घाडी यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या नावाची घोषणा सेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी केली. यावेळी मुंबईचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, भाजपचे पालिकेतील गटनेते गणेश खणकर, शिवसेनेचे (शिंदे) पालिकेतील गटनेते अमेय घोले, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि दोन्ही पक्षांचे नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौरपदासाठी रितू तावडे यांनी शनिवारी सकाळी ११.२१ वाजता त्यांचा अर्ज महापालिका चिटणीस मंजिरी देशपांडे यांना सादर केला. त्यांच्या अर्जावर भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनी सूचक म्हणून तर शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. तर उप महापौर पदासाठी संजय घाडी यांनी शनिवारी सकाळी ११.२४ वाजता त्यांचा अर्ज महापालिका चिटणीस यांना सादर केला. त्यांच्या अर्जावर शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी सूचक म्हणून तर भाजपचे गटनेते गणेश खणकर यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे.
हायकमांडचा आदेशच नाही आश्रफ आझमी मुंबईच्या महापौर पदासाठी उमेदवार रिंगणात उतरवायचा की नाही याबाबत हायकमांडने कुठलाही आदेश दिलेला नाही. त्यामुळे मुंबईच्या महापौर पदासाठी काँग्रेसने उमेदवार दिला नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे नगरसेवक आश्रफ आझमी यांनी दिले आहे.
रितू तावडे यांचा परिचय!
भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांनी घाटकोपर ( प.) येथील प्रभाग क्रमांक १२७ मधून २०१२ रोजी भाजपकडून निवडणूक लढवून नगरसेवक पद प्रथमच मिळविले होते. त्यांनी शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. तसेच त्यांनी उपाध्यक्षा, स्थापत्य समिती, मुंबई उपनगरे पद देखील भूषवले होते. २०१७ मध्ये त्यांनी भाजपकडून प्रभाग १२७ मधून निवडणूक लढवली होती. मात्र शिवसेनेचे (अखंड) तुकाराम पाटील यांनी त्यांचा पराभव केला.
त्यानंतर यावेळी पुन्हा तिसऱ्यांदा त्यांनी प्रभाग १३२ मधून निवडणूक लढवून शिवसेने (ठाकरे) उमेदवार क्रांती मोहिते यांचा १६,१६५ मतांनी पराभव करून विजय मिळवला. त्यांनी भाजपमध्ये जिल्हा अध्यक्षा म्हणून काम केले. रितू तावडे या हिंदू मराठा असून त्यांचा जन्म १८ एप्रिल १९७३ रोजीचा आहे. त्या कोकणातील कणकवली, खारेपाटण, कुंकवन येथील आहेत. सध्या त्या घाटकोपर (पश्चिम) येथे राहतात. एस.वाय.बी.कॉम. पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांचा मे. आर. आर. एंटरप्राईजेस नावाने व्यवसाय आहे. त्यांच्या पतीचे नाव राजेश मधुकर तावडे असून त्यांना अॅड. मधुरा राजेश तावडे आणि यश राजेश तावडे अशी दोन मुले आहेत.
'सेवक म्हणून काम करणार'
मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होत आहे. ४४ वर्षांनंतर भाजपचा महापौर बनणार आहे. मुंबईच्या महापौरपदावर बसल्यानंतर मुंबई महापालिकेचे ट्रस्टी आणि मुंबईकरांचे सेवक म्हणून काम करणार आहोत. मुंबईकरांच्या जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण करणार. मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते देणार आणि मुंबई महापालिकेला भ्रष्टाचारमुक्त करणार, असा निर्धार महापौरपदाच्या उमेदवार रितू तावडे यांनी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन समोर ठेवून आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश खणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेत कामकाज करणार आणि मुंबईचा विकास करणार आहोत, असेही त्या म्हणाल्या. मुंबईत घुसलेल्या बांगलादेशी घुसखोरांना मुंबईतून हद्दपार करण्यात येईल. तसेच, मुंबई शहराला बांगलादेशीमुक्त शहर बनविण्यात येईल, असे वचन रितू तावडे यांनी मुंबईकरांना दिले आहे. मुंबईचा रंग हा भगवाच राहणार आहे, आसा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

