काम वेळेत झाले तरच देयके द्या! नालेसफाई कामांबाबत मुंबई महापालिकेचा कडक पवित्रा

मिठी नदीतून गाळ काढण्याचे काम योग्य प्रकारे व वेळेत झाले असेल तरच देयके देण्यात यावीत, असे आदेश मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.
काम वेळेत झाले तरच देयके द्या! नालेसफाई कामांबाबत मुंबई महापालिकेचा कडक पवित्रा
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मिठी नदीतून गाळ काढण्याचे काम योग्य प्रकारे व वेळेत झाले असेल तरच देयके देण्यात यावीत, असे आदेश मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत.

महापालिकेकडून १२ मार्चपासून गाळ काढण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी काही कामांना बांगर यांनी नुकतीच भेट दिली. देयके देताना विलंब करू नका. असे नमूद करून बांगर म्हणाले की, मात्र, असे करत असताना कामांची गुणवत्ता, सातत्य आणि संगणकीय प्रणालीवरील माहिती अद्ययावत आहे की नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसे आढळून न आल्यास संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील एमएमआरडीए कार्यालय (जेतवन उद्यान) येथे मिठी नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. या ठिकाणी गाळ काढण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. या ठिकाणी अवैधरीत्या राडारोडा टाकला जाणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी. असे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही बांगर म्हणाले.

मिठी नदीच्या तीनही पॅकेज अंतर्गत आणि मोठ्या, छोट्या नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांचा वेग वाढवण्यात यावा. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबते अशा ठिकाणांवर प्राधान्याने आणि सुयोग्य नियोजनासह लक्ष देण्यात यावे.

पाणी ठिकाणांबाबत आवश्यक साचण्याच्या कार्यवाही करून तो निकाली निघेल, अशा पद्धतीने नालेस्वच्छतेच्या कामांचे नियोजन करावे, असे निर्देश बांगर यांनी दिले आहेत.

अंबानी शाळेलगत मिठी नदीतून गाळ काढण्यात येत आहे. पारंपरिक तंत्रज्ञानासह नावीन्यपूर्ण प्रयोगाद्वारे गाळ काढण्यात येत असेल तर अशा प्रयोगांचे स्वागत करण्यात येईल, असे बांगर यांनी सांगितले. यावेळी प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) कल्पना राऊळ, उप प्रमुख अभियंता संजय इंगळे यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.

गेल्या वर्षीप्रमाणे नियोजन करा !

गेल्या वर्षी उषानगर, भांडुप रेल्वे स्थानक आणि जॉली जिमखाना या ठिकाणी तसेच हायवे सोसायटीकडून येणाऱ्या पाण्यामुळे चुनाभट्टी रेल्वे स्थानक या ठिकाणी पाणी साचण्याची समस्या उद्भवली नाही. त्याचप्रमाणे नियोजन करण्याचे निर्देश बांगर यांनी यंत्रणेला दिले.

रेल्वे हद्दीतील कल्व्हर्ट वेळीच साफ करा !

लक्ष्मीबाग, सोमय्या नाला आणि पंतनगर येथे मोरी (कल्व्हर्ट) बसवले आहेत. याबाबत मध्य रेल्वेच्या यंत्रणेनेसोबत संयुक्त पाहणी केली आहे. रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे मोरी (कल्व्हर्ट) मधील गाळ साफ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तीसुद्धा विहित वेळेत पूर्ण केली जाईल, याची दक्षता घ्यावी, असेही बांगर यांनी सांगितले.

फ्लडिंग स्पॉटवर लक्ष केंद्रित करा !

मुलुंड येथील बाऊंड्री नाला येथे सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाची पाहणी करताना बांगर यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, ज्या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबते अशा ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. कंत्राटदाराने काढलेला ओला गाळ ४८ तास उन्हात वाळल्यानंतरच त्याचे वहन होत आहे की नाही, याकडेही संबंधित अभियंत्यांनी प्राधान्याने लक्ष केंद्रित करावे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला संबंधित कंत्राटदारानेदेखील दैनंदिन कामकाजाचा वाहननिहाय तपशील व्हिडीओसह संगणकीय प्रणालीवर अद्ययावत करणे गरजेचे आहे. महापालिका अधिकारी आणि कंत्राटदाराने समन्वयाने काम करत दाटीवाटीच्या वस्तीच्या ठिकाणी पाणी तुंबणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश बांगर यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in