मुंबई : कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबई महापालिकेच्या कामगार, कर्मचारी व पेन्शनधारकांच्या मार्चच्या वेतनातील तसेच निवृत्तीधारकांची पेन्शनची रक्कम आयकरापोटी प्रशासनाने कापल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया आहेत. दरम्यान, कापून घेण्यात आलेली रक्कम आगाऊ रक्कम म्हणून त्वरित देण्यात यावी, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर युनियनने केली आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास युनियनतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अध्यक्ष अशोक जाधव व सरचिटणीस वामन कविस्कर यांनी दिला आहे.
पालिकेतील कर्मचारी, अधिकारी व पेन्शनधारकांची गेल्या मार्च महिन्याची आयकरापोटीची रक्कम प्रशासनाने कापून घेतली आहे. ही रक्कम कापताना कोणतीही पूर्वसूचना न देता कापण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाच्या प्रतिक्रिया आहेत. वेतनातील रक्कम कापण्यात आल्यानंतर संघटनेने गेल्या २७ मार्च व ४ एप्रिल २०२४ रोजी पालिका आयुक्त व सर्व संबंधित अधिकारी यांना लेखी पत्रव्यवहार करून ही बाब लक्षात आणून देण्यात आली. कर्मचाऱ्यांची आयकरापोटी कापून घेण्यात आलेली रक्कम आगाऊ रक्कम म्हणून त्वरित देण्यात यावी, अशी मागणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर ज्या कर्मचाऱ्यांनी आपले पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही म्हणून आयकरपोटी रक्कम कापण्यात आल्याचे सांगण्यात आले, असे संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी माहिती दिली; मात्र कामगार, कर्मचाऱ्यांना आपले पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याबाबतचे निर्देश जून २०२३ ला देण्यात आले होते. याची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नव्हती, असे युनियनने स्पष्ट केले आहे.