मुंबई : मुंबई महापालिकेने रस्त्यावरील जाहिराती फलकांसाठी धोरणाचा नवा मसुदा तयार केला असून येत्या २६ ऑगस्टपर्यंत हरकती-सूचना दाखल करता येतील. नव्या धोरणाचे वैशिष्ट्य म्हणजे फलकांच्या आकाराविषयी शहर आणि पूर्व तसेच पश्चिम उपनगरांत सध्या लागू असलेले भिन्न निकष रद्द करून सर्व ठिकाणी कोणत्याही आकारासाठी अर्ज करता येईल. शिवाय मंजुरीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली जाईल.
जाहिरात विषय धोरण २०१८ नंतर अद्ययावत करण्यात आलेले नाही. ते दहा वर्षांसाठीच होते. याबाबत दाखल जनहित याचिकांवर न्यायालयाने वेळोवेळी निर्देश दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या धोरणाचा मसुदा तयार केला आहे. मुंबईचे असलेले महत्त्व लक्षात घेता रस्त्यावरील जाहिरात फलकांबाबत ३ विभागांत असलेले फलकांच्या आकाराबाबतचे वेगवेगळे निर्बंध मागे घेण्यात आले आहेत.
मॉल, व्यापारी संकुलांना स्वातंत्र्य
खास बाब म्हणजे डिजिटल जाहिराती धोरण राबविले जाणार असून एलईडी जाहिराती झळकवण्यासाठी मॉल, मल्टिप्लेक्स, व्यापारी संकुले, व्यापारी किंवा वाणिज्यिक कामकाज चालणाऱ्या इमारती आदींना कोणत्याही एजन्सी विना स्वतःच जाहिरात फलकांसाठी अर्ज करता येतील. त्यासाठी वाहतूक विभागाच्या सहआयुक्त स्तरावर ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल.