मुंबई : मुंबई महापालिकेतील निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आता पक्ष कार्यालयाचे वाटप विविध पक्षांना करण्यात आले आहे. पालिका मुख्यालयातील तळ मजल्यावर असलेल्या काँग्रेसच्या आधीच्या कार्यालयाचा दरवाजा पश्चिमेला असल्याने शिंदेसेनेने नकार दिला होता.
प्रति पालिका मुख्यालयातील तळ मजल्यावर उद्धव ठाकरे सेनेचे कार्यालय असलेल्या कार्यालयातच एकनाथ शिंदे यांच्या सेना नगरसेवकांना कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे व शिंदे पालिकेत शेजारी शेजारी असणार आहेत.
मुंबई महापालिका मुख्यालयातील कार्यालयावरून रस्सीखेच सुरू होती. पालिका मुख्यालयातील काँग्रेसचे आधीचे कार्यालय शिंदेसेनेला देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र त्या कार्यालयाचा दरवाजा पश्चिमेला असल्याने वास्तुदोष असल्याचे सांगत शिंदेसेनेने त्या कार्यालयास नकार दिला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे तळमजल्यावर असलेल्या कार्यालयाशेजारीच कार्यालय द्यावे, अशी मागणी शिंदेसेनेने केली होती. परंतु ठाकरेंच्या कार्यालयातील ३० टक्के जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.