
पूनम पोळ/ मुंबई
यंदा मुंबईत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने शड्डू ठोकला आहे. आतापर्यंत पालिकेच्या वतीने मूर्तिकारांना शाडू मातीचा पुरवठा केला जात असतानाच, आता पालिका शाडू मातीच्या मूर्ती ऑनलाइन व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी पालिका प्रशासनाने ई-कॉमर्स कंपन्यांशी संपर्क साधला असून त्यांच्यासोबत पत्रव्यवहारदेखील केला आहे. या पत्रव्यवहाराला समोरून प्रतिसाद आल्यावर पालिकेची ही योजना यावर्षापासून अंमलात येईल. असा विश्वास पालिका सूत्रांनी व्यक्त केला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडाळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. मूर्तिकारांना मंडपांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर जागा आणि मूर्ती साकारण्यासाठी शाडू माती मोफत पुरवित आहे. या सुविधांचा वापर करून मुंबईतील मूर्तिकारांना जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्ती तयार करून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. त्यानुसार २०२४ साली सुमारे ६० हजारहून अधिक गणेश मूर्ती शाडू मातीपासून बनवल्या होत्या. परंतु यंदा गणेशोत्सव २०२५ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका मूर्तिकारांना मंडपाकरिता मोफत जागा पुरवित आहे. तसेच, पालिकेच्या वतीने आतापर्यंत ८३० टन शाडू मातीचा पुरवठा मूर्तिकारांना करण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने प्रत्येक परिमंडळांमध्ये माती खरेदीसाठी प्रत्येकी २० लाख रुपयांची आर्थिक तरतूद केलेली आहे, त्यातून या शाडू माती खरेदी करून प्रत्येक परिमंडळांमधील वॉर्डांना पुरवठा केला जात आहे.
दरम्यान, यंदाच्या वर्षात भाविकानी शाडू मातीच्या मूर्तींना अधिक पसंती द्यावी. आणि पर्यावरणीय प्रदूषण टाळण्यासाठी हातभार लावावा. यासाठी पालिका मूर्तिकारांना ऑनलाइन बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे. जेणेकरून भाविकांना कमी कालावधीतही बाप्पाची शाडू मातीची मूर्ती घरापर्यंत उपलब्ध होईल. यासाठी भाविकांना किमान १५ दिवस आधी गणपती बाप्पाची मूर्ती बुक करावी लागणार आहे.
या व्यासपीठावर उपलब्ध होऊ शकते मूर्ती
स्विगी इन्स्टामार्ट, ब्लिंकिट, झोमॅटो, झेप्टो, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, जिओमार्ट आणि बिग बास्केट.
मूर्तीचे दर आणि उंची चर्चेनंतर ठरणार
पालिकेने ई-कॉमर्स कंपनीशी पत्रव्यवहार केला असून येत्या आठवड्यात त्यांच्याकडून प्रतिसाद येणे अपेक्षित आहे. त्यानंतर त्यांच्याशी आणि मूर्तिकारांशी चर्चा करून शाडू मातीच्या मूर्तीचे दर ठरवण्यात येतील. तसेच, या दरम्यान, मूर्तीची उंची साधारण किती असावी याबाबत चर्चा होणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.