

मुंबई : दादर येथील मनपा वास्तू सेंट्रल बिल्डिंगमधील १०० हून अधिक वाहनांची क्षमता असलेले वाहनतळ जून २०२३ पासून वाहनांच्या पार्किंगसाठी वापरात नसल्याचे उघड झाले आहे. या जागेचा वापर जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाकडून नाटकांचे सेट्स आणि अन्य साहित्य ठेवण्यासाठी केला जात आहे. आता ही जागा पुन्हा वाहनतळासाठी द्यावी, असे आदेश मुंबई मनपाने दिले आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ अंतर्गत कोविड महामारीच्या अनुषंगाने या वापरास परवानगी देण्यात आली होती. महानगरपालिका आयुक्तांनी एमजीसी/एफ/९९१४ १५ जून २०२३ या संदर्भाने जून २०२४ पर्यंत मंजुरी दिली होती. त्यानंतर जून २०२४ ते जून २०२५ या कालावधीसाठी उपायुक्त (परि. २) यांनी एमडीएफ/७८१, २१ जून २०२४ या संदर्भाने मंजुरी दिली होती.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटले की, “महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहनतळाचा वापर वाहनांच्या पार्किंगसाठी होणे अपेक्षित आहे. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या परवानगीचा कालावधी संपल्यानंतरही वाहनतळाची जागा नाटकांचे सेट्स ठेवण्यासाठी वापरली जात असेल, तर त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. एकीकडे दादर परिसरात पार्किंगसाठी जागेची कमतरता असताना महापालिकेचे वाहनतळ वापराबाहेर राहणे योग्य नाही. पालिकेने संबंधित जागा तातडीने रिकामी करून घेऊन वाहनतळ नागरिकांसाठी सुरू करावे. तसेच सार्वजनिक सुविधांचा वापर त्यांच्या मूळ उद्देशानुसार होतो की नाही, यावर नियमित देखरेख ठेवावी.”
दादर हे मुंबईतील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे खरेदीसाठी हजारो लोक येत असतात. दादर परिसरातील पार्किंगची समस्या लक्षात घेता, महापालिकेने या प्रकरणात तातडीने कार्यवाही करून वाहनतळ पुन्हा नागरिकांच्या सेवेत आणावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
... तर कारवाई करणार
मुंबई मनपाने नाट्यनिर्मात्या संघाला वाहनतळाची जागा तत्काळ रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत. ही जागा रिकामी न केल्यास महानगरपालिकेच्या लागू तरतुदींनुसार पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीद्वारे देण्यात आला आहे. कोहिनूर वाहनतळात मराठी नाट्यनिर्मात्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी तसेच वास्तू सेंट्रल बिल्डिंग येथील वाहनतळात नाटकांचे सेट्स व अन्य साहित्य ठेवण्यासाठी परवानगी देता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.