धोकादायक झाडांची टांगती तलवार; झाडांची काळजी न घेतल्याने पालिकेची कारवाई

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये आणि करदात्या मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने यंदा पावसाळ्यापूर्वी कामावर लक्ष केंद्रित केले आहे. पावसाळ्यात मुंबईत ही मोठ्या वेगाने वारे वाहतात आणि झाडे उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडतात.
धोकादायक झाडांची टांगती तलवार; झाडांची काळजी न घेतल्याने पालिकेची कारवाई

मुंबई : झाडं, झाडांची फांदी कोसळून विशेषतः पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही सोसायटी, शासकीय निमशासकीय गृहनिर्माण संस्था या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आल्याने १ हजार ८५५ शासकीय निमशासकीय गृहनिर्माण संस्थांना पालिकेच्या उद्यान विभागाने नोटीस बजावली आहे. दरम्यान, सोसायटी, गृहनिर्माण संस्थांनी पालिकेच्या परवानगी आपल्या परिसरातील धोकादायक झाडांची छाटणी करून घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये आणि करदात्या मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने यंदा पावसाळ्यापूर्वी कामावर लक्ष केंद्रित केले आहे. पावसाळ्यात मुंबईत ही मोठ्या वेगाने वारे वाहतात आणि झाडे उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडतात. पावसाळ्यात या घटना घडू नये यासाठी धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने छाटणीची कामे उद्यान विभागाकडून सुरू आहेत. यंदा मुंबईत एकूण एक लाख ११ हजार ६७० झाडांची छाटणी करण्याचे उद्दिष्ट आहे, यापैकी १२ हजार ४६७ झाडांची छाटणी झाली आहे. ७ जून अखेरपर्यंत उर्वरित ९९ हजार २०३ झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे.

उद्यान विभागाकडून झाडांची छाटणी

उद्यान विभागाकडून करण्यात येणाऱ्या पावसाळापूर्व कामांमध्ये प्रामुख्याने मृत तसेच धोकादायक असलेल्या झाडांचे निर्मूलन, अनावश्यक फांद्यांचे निर्मूलन, फळे व झावळ्या काढणे, उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, झाडांच्या ढोली व पोकळ्या भरण, झाडांचा तोल सुस्थितीत आणणे व झाडांची मुळे/खोड तसेच पानांवर कीटकनाशकांची फवारणी करणे आदींचा समावेश आहे. 'महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५'नुसार महानगरपालिका क्षेत्रातील झाडांची सुयोग्यपणे छाटणी केली जाते.

पावसाळापूर्व कामांना वेग

मुंबई महापालिकेच्या विविध विभागामार्फत पावसाळा पूर्व कामे करण्यात येत आहेत. पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी यांनी ही सर्व पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व संबंधित खात्यांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्यान खात्याकडून करण्यात येणारी कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी दिले आहेत. त्यानुसार उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या देखरेखीखाली उद्यान विभागाने पावसाळापूर्व कामांना वेग दिला आहे.

१ लाख ८६ हजार २४६ वृक्षांचे सर्वेक्षण

उद्यान विभागाने यंदा मुंबईतील आकाराने मोठ्या अशा सुमारे १ लाख ८६ हजार २४६ वृक्षांचे सर्वेक्षण केले. त्यात, रस्त्यांच्या कडेला सुमारे १ लाख ११ हजार ६७० झाडे आहेत. ५ एप्रिलपर्यंत १२ हजार ४६७ झाडांच्या फांद्या छाटणी करण्‍यात आली आहे. तर ७ जून अखेरपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. पालिकेच्‍या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये या कामी यंत्रसामुग्री, मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, खासगी गृहनिर्माण संस्थांनी महानगरपालिकेची पूर्व परवानगी घेऊन झाडांची सुयोग्य छाटणी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

मुंबई ३० लाख झाडांचा बहर

बृहन्मुंबई महानगरपालिका, क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. यापैकी १५ लाख ५१ हजार १३२ एवढी झाले खासगी संस्थांच्या आवारात आहेत. तर १० लाख ६७ हजार ६४१ एवढी झाले शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत.

logo
marathi.freepressjournal.in