काँक्रिट रस्त्यांच्या दर्जासाठी 'आयआयटी'ची नियुक्‍ती; BMC सोबत सामंजस्‍य करार

मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे प्रगतीपथावर आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेची (आयआयटी) त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई महानगरातील विविध रस्त्यांची सिमेंट काँक्रिटीकरण कामे प्रगतीपथावर आहेत. सिमेंट काँक्रिटीकरण कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राहावी यासाठी मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेची (आयआयटी) त्रयस्थ संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

यापुढे मुंबईत रस्ते विकासाची कामे करताना आवश्यक तो दर्जा, गुणवत्ता राखण्याची जबाबदारी भारतीय तंत्रज्ञान संस्थेकडे असेल. या कामकाजासाठी महानगरपालिका आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्‍यात बुधवार ११ सप्‍टेंबर रोजी सामंजस्‍य करार करण्‍यात आला.

महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍या प्रमुख उपस्थितीत सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षऱ्या करण्‍यात आल्‍या. महानगरपालिकेच्‍यावतीने प्रमुख अभियंता (रस्‍ते व वाहतूक) गिरीश निकम यांनी, तर भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेच्‍या वतीने अधिष्‍ठाता (संशोधन व विकास) प्रा. सचिन पटवर्धन यांनी स्‍वाक्षरी केली. यावेळी भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे उपसंचालक प्रा. के. व्‍ही. कृष्‍ण राव, अधिष्‍ठाता पी. वेदगिरी, प्रा. सोलोमन देबबर्मा यांच्‍यासह महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात ३९२ किलोमीटर, तर दुसऱ्या टप्प्यात ३०९ किलोमीटर असे एकूण ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रिटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत.

आयआयटीची जबाबदारी

रस्‍त्‍यांच्‍या देखभाल, पुनर्रचना व पुनर्वसनासाठी योग्‍य पद्धती निश्चित करण्‍याकामी आवश्‍यक सल्‍ला देणे, गुणवत्ता तपासणीचे निकष प्रत्येक प्रकरणाच्या आवश्यकतेनुसार तपासणे, गुणवत्तेची खात्री करण्यासाठी चाचण्या घेणे आणि गुणवत्ता नियंत्रण चाचणी अहवालांची तपासणी करणे, तांत्रिक लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, गुणवत्तेची खात्री करण्यासाठी नियमितपणे प्रकल्‍पस्‍थळास भेटी देणे इत्‍यादी बाबींचा समावेश भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्‍या कामकाजाच्‍या व्‍याप्‍तीत करण्‍यात आला आहे.

भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्‍या नियुक्‍तीमुळे सिमेंट काँक्रिट रस्‍त्‍यांच्‍या कामात अत्‍युच्‍च गुणवत्‍ता राखली जावी यासाठी मदत होणार आहे. अधिक गतीने कामे करताना गुणवत्‍ता ढासळू नये यासाठी कोणत्‍या बाबींची काळजी घ्‍यावी यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मार्गदर्शन करणार आहे. - भूषण गगराणी, मुंबई पालिका आयुक्त

logo
marathi.freepressjournal.in