
मुंबई : आरे वसाहतीत रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामात अक्षम्य दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारास पालिकेच्या सर्व विभागांच्या निविदा प्रक्रियेत पुढील दोन वर्षांसाठी सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. ५ लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय २ रस्ते कंत्राटदारांना प्रत्येकी २० लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. रस्ते काँक्रिटीकरणात त्रुटी खपवून घेतली जाणार नाही, तसे आढळल्यास कारवाई करू, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
आरे वसाहतीतील दिनकरराव देसाई मार्गाचे सिमेंट काँक्रिट व मास्टिक अस्फांल्ट सुधारणा काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे आढळून आल्यामुळे कंत्राटदारास नोटीस बजावण्यात आली. दंडाची आकारणी करून निकृष्ट काम त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, दुरुस्तीतदेखील कंत्राटदाराने दिरंगाई केली. याबाबत समाधानकारक खुलासा नसल्याने कंत्राटदारास निविदा प्रक्रियेत २ वर्षांसाठी सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. ५ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
डॉ. नीतू मांडके मार्ग येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला भेट दिली. रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पस्थळी आढळलेला स्लम्प १६० मिमी होता तर प्रत्यक्ष कार्यस्थळी स्लम्प १७० मिमी असल्याचे आढळून आले. याप्रकरणी हलगर्जीपणाबाबत रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पास २० लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असून नोंदणी रद्द करण्यात आली आहे. बी विभागातील कारागृह मार्ग या ठिकाणी रस्ते कामाच्या ठिकाणी रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पामधून आलेले काँक्रिट मिश्रण असमाधानकारक आढळले. याबाबत कंत्राटदार व रेडी-मिक्स काँक्रिट प्रकल्पास नोटीस बजाविण्याात आली.
राज्याचे उप मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुंबईतील सिमेंट काॅंक्रिटच्या रस्त्यांची पाहणी केली होती. यावेळी रस्ते कामात कुचराई केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला होता. यापुढेही रस्ते कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, त्याची अंमलबजावणी दुसऱ्या दिवशी, मंगळवारी झालेली पहायला मिळाली.