

मुंबई : चेंबूर येथील झाड दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मुंबईतील झाडांच्या आरोग्य अभ्यासासाठी कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. झाडांचे अतिधोकादायक, धोकादायक व सुदृढ अशी वर्गवारी करण्यासाठी तसेच झाडांचे आयुर्मान आणि प्रकृतीबाबत परिस्थितीजन्य अभ्यास करण्यासाठी मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागात वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांकडून झाडांचे सर्वेक्षण करावे.
झाड पडून दुर्घटना घडू नये, यासाठी विशेष खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात. वृक्षतज्ज्ञ, वनस्पतीशास्त्रज्ञ, पर्यावरणाचे अभ्यासक आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांची सखोल चर्चा झाली.
मुंबईत २२ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत वाहणाऱ्या अतिवेगवान वाऱ्यामुळे ८३० झाडे पडली. या ८३० झाडांपैकी ४८० झाडे खासगी क्षेत्रातील होती. जेवढी झाडे पडतात त्यापेक्षा जास्त फांद्या पडतात. आतापर्यंत यंदा १२३८ फांद्या पडल्या. त्यापैकी ७०९ या खासगी क्षेत्रातील होत्या. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली.
या बैठकीस ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ तथा जीवशास्त्रज्ञ प्रा. संजय देशमुख, पर्यावरण अभ्यासक श्रीकांत इंगलकळीकर, वृक्षतज्ज्ञ वैभव राजे, अभिजीत सामंत, दीपक जयंत पाटील, उप आयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी, प्रमुख अभियंता (रस्ते) मंतय्या स्वामी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी तसेच उद्यान विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, विद्यार्थी आणि वृक्षतज्ज्ञ यांच्या सहभागातून झाडांचे सर्वंकष सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव मांडला. या सर्वेक्षणाच्या आधारे रस्त्यांच्या दुतर्फा असणाऱ्या झाडांचे अतिधोकादायक, धोकादायक आणि सुदृढ अशा श्रेणींमध्ये वैज्ञानिक वर्गीकरण करण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली. तसेच झाडांचे वय, प्रजाती, आरोग्य, संरचनात्मक स्थिती, आयुर्मान व परिस्थितीजन्य माहितीचा स्वतंत्र डेटाबेस तयार करण्यावर भर देण्यात आला.
वृक्षांचे आरोग्य, योग्य छाटणी, झाडांची निगा आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत वृक्षतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली माहिती पुस्तिका तयार करून ती मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. विविध विकासकामांमुळे होणाऱ्या वृक्षतोडीच्या बदल्यात लावण्यात येणारी नवीन झाडे शक्यतो मुंबईतच लावावीत.
दीर्घकालीन धोरणे तयार करणार !
मुंबईत विविध ठिकाणी ‘बायो-डायव्हर्सिटी झोन’ विकसित करून स्थानिक जैवविविधतेला पूरक वृक्षलागवड करण्याची संकल्पना, रस्त्यालगत वृक्षलागवडीसाठी योग्य जागांची निवड, तसेच भविष्यातील हवामान बदलाचा विचार करून वृक्ष व्यवस्थापनाची दीर्घकालीन धोरणे तयार करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. तसेच, शहरामध्ये योग्य जागांची निवड करून बांबू लागवड वाढविण्यावरही चर्चा करण्यात आली.
झुकलेल्या झाडांना यांत्रिक पद्धतीने टेकू !
बैठकीत उपस्थित तज्ज्ञांनी झाडांच्या संरक्षणासाठी केवळ महानगरपालिकेने काम करून भागणार नाही, तर त्यासाठी नागरिकांचा सहभाग, जनजागृती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तितकाच महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले. तसेच रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या आणि एका बाजूला झुकलेल्या झाडांना यांत्रिक पद्धतीने टेकू देता येईल का, यावरही अभ्यासकांनी मत मांडले.
कर्मचाऱ्यांना अद्ययावत प्रशिक्षण देणार !
वृक्षांचे संगोपन कसे करावे, जमिनीपासून वर दिसणाऱ्या झाडासह जमिनीखालील मुळांचाही शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्यासाठी मनपाच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा मुद्दा अतिरिक्त मुंबई महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी मांडला. यामुळे झाडांची जोपासना शास्त्रशुद्धपणे होण्यास मदत मिळणार आहे. कारण मुंबईत मोठी वृक्षसंपदा आहे.