.avif?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
‘हिट अँड रन’ प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाने पार्टी केलेल्या जुहू येथील ‘व्हाईस ग्लोबल तापस बार’वर बुधवारी पालिकेचा बुलडोझर फिरला. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने केलेल्या कारवाईत स्वयंपाकघर, वाढीव छत शेड आदी जमीनदोस्त करण्यात आले आहेत.
जुहू येथील अनधिकृत बांधकामाविरोधातील मोहीम पालिकेच्या के/पश्चिम अंधेरी विभागाकडून तीव्र करण्यात आली आहे. यामध्ये जुहू चर्च मार्गावरील ‘व्हाईस ग्लोबल तापस बार’ने केलेल्या सुमार ३ हजार ५०० चौरस फुटाच्या वाढीव, अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत स्वयंपाकघर, तळमजला आणि बंदिस्त छतावरील वाढीव, अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला. अतिक्रमण निर्मूलन पथकाने अंदाजे ३ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे बांधकाम तोडले. पालिकेचे ५ अभियंते, २ अधिकारी, २० कामगार अशा मनुष्यबळासह १ जेसीबी संयंत्र, इलेक्ट्रिक ब्रेकर्स, गॅस कटर्स आदी साधनांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.