गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने यंदा ३८३ हून अधिक कृत्रिम तलावांची व्यवस्था केली असून, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात
गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात
Published on

मुंबई : श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने यंदा ३८३ हून अधिक कृत्रिम तलावांची व्यवस्था केली असून, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन सोहळा पार पडावा यासाठी तब्बल २५ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. दरम्यान, सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

यंदा १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, विसर्जनासाठी पालिका प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. ४४ समुद्रकिनारे व जेट्टी आणि २३ नैसर्गिक तलाव अशा एकूण ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवर सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच २७८ ठिकाणी ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने मूर्तिकारांना आतापर्यंत ९४० मेट्रिक टनांहून अधिक शाडू माती मोफत वितरित केली आहे. याशिवाय यंदा २५ हजार ४०० लिटर पर्यावरणपूरक रंग मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

विसर्जन मार्गांवरील पूर्वतयारीत २८१ ठिकाणच्या अडथळा निर्माण करणाऱ्या केबल्स हटविण्यात आल्या आहेत. आगमन व विसर्जन मार्गांवरील ५०६ रस्त्यांवरील ४,२७९ खड्डे आणि १७१ ड्रेनेज कव्हर्सची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच ५१५ ठिकाणी वृक्षछाटणी करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील किमान ८ ते १० स्वयंसेवकांना प्रथम प्रतिसादक आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सहा फुटांपर्यंतच्या मूर्ती कृत्रिम तलावातच

उच्च न्यायालयाच्या २० ऑगस्ट २०२६ रोजीच्या निर्देशांनुसार, अंतिम निर्णय होईपर्यंत २४ जुलै २०२५ रोजीच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यानुसार सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करणे बंधनकारक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करून पालिकेच्या व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन उपआयुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

‘एक गणपती, एक झाड’ उपक्रम

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महापौर रितू तावडे यांच्या संकल्पनेतून यंदा ‘एक गणपती, एक झाड’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईत विसर्जित होणाऱ्या गणेशमूर्तींच्या संख्येइतकी झाडे लावण्याचा पालिकेचा संकल्प आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

गिरगाव चौपाटीवर विशेष व्यवस्था

स्वराज्यभूमी अर्थात गिरगाव चौपाटी येथे मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन होत असल्याने येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. १२ कृत्रिम तलाव, २० निरीक्षण मनोरे, ९० प्रसाधनगृहे, २२ तराफे, २२ निर्माल्य कलश, ३ रुग्णवाहिका आणि सुमारे एक हजार मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्र, फ्लड लाईट व सर्च लाईटचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

जेलीफिश, स्टिंग रेपासून सावधान

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर ‘ब्ल्यू बटन जेलीफिश’ आणि ‘स्टिंग रे’ प्रजातींचा वावर आढळत असल्याने विसर्जनाच्या वेळी नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. समुद्रात उतरताना पालिका आणि पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विसर्जनासाठी अशी आहे यंत्रणा

  • ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव

  • नैसर्गिक विसर्जन स्थळे

  • १,१३२ जीवरक्षक

  • ८५ रुग्णवाहिका

  • ३४ क्रेन

  • १० मोटरबोटी

  • ४९८ निर्माल्य कलश

  • ३२६ निर्माल्य डंपर

  • २२८ नियंत्रण कक्ष

  • ७५ निरीक्षण मनोरे

  • ६,०५२ फ्लड लाईट/सर्च लाईट

  • ४८९ तात्पुरती प्रसाधनगृह

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in