‘बेस्ट’ला २०० कोटी देण्याची पालिकेची तयारी; डॉ. भूषण गगराणी यांची 'नवशक्ति'ला माहिती

आर्थिक कोंडीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमास पालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे.
‘बेस्ट’ला २०० कोटी देण्याची पालिकेची तयारी; डॉ. भूषण गगराणी यांची 'नवशक्ति'ला माहिती

गिरीश चित्रे/मुंबई :

आर्थिक कोंडीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमास पालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. मुंबई महापालिकेच्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात बेस्ट उपक्रमास अनुदानापोटी ८०० कोटींची तरतूद केली आहे. त्यापैकी फक्त २०० कोटी रुपये बेस्ट उपक्रमास देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी दैनिक 'नवशक्ति'ला दिली. दरम्यान, कर्मचाऱ्यांची देणी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी यासाठी ही २०० कोटींची मदत करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमास उतरती कळा लागली आहे. दिवसेंदिवस बेस्टची आर्थिक कोंडी वाढतच आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, कार्यरत कामगारांचा पगार, आस्थापना खर्च, वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरची देणी, अशा कर्जात बेस्ट उपक्रमाचे चाक रुतत चालले आहे. बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पालिकेने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी बेस्ट उपक्रमाने सन २०१६-१७ मध्ये केली.

पालिकेचे अंग असलेल्या बेस्टला सावरण्यासाठी पालिका प्रशासनाने टप्प्याटप्प्याने मदतीचा हात पुढे केला आणि आतापर्यंत ८,५०० कोटींची मदत केली आहे. तरीही आणखी तीन हजार कोटींची मागणी बेस्ट उपक्रमाने पालिका प्रशासनाकडे नुकतीच केली होती. मात्र, आतापर्यंत केलेल्या ८,५०० कोटींचा हिशोब दिला नाही. त्यामुळे तीन हजार कोटींची मागणी पालिका प्रशासनाने फेटाळली. मात्र, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, कार्यरत कामगारांचा पगार, आस्थापना खर्च यासाठी २०० कोटी रुपये देण्यात येणार असल्याचे डॉ. भूषण गगराणी यांनी सांगितले.

यासाठी पैसे वापरण्याच्या सूचना

  • सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देणे

  • सध्या कार्यरत कामगारांचा पगार देणे

  • आस्थापना खर्च

  • वीजपुरवठा करणाऱ्या टाटा पॉवरची देणी

  • बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान

logo
marathi.freepressjournal.in