BMC च्या सुरक्षा दलाचे बळकटीकरण होणार; १,४६५ पदांच्या जम्बो भरतीची अतिरिक्त आयुक्तांकडून घोषणा

मुंबई महापालिकेच्या मालमत्तांचे डोळ्यात तेल घालून सुरक्षा करणाऱ्या पालिकेच्या सुरक्षा दलाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे.
BMC च्या सुरक्षा दलाचे बळकटीकरण होणार; १,४६५ पदांच्या जम्बो भरतीची अतिरिक्त आयुक्तांकडून घोषणा

मुंबई : मुंबई महापालिकेच्या मालमत्तांचे डोळ्यात तेल घालून सुरक्षा करणाऱ्या पालिकेच्या सुरक्षा दलाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ६५ सहाय्यक सुरक्षा अधिकारी आणि १,४०० सुरक्षा अधिकाऱ्यांची रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगर) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली. पालिकेच्या सुरक्षा दलाचा ५८ वा वर्धापन दिन शुक्रवारी भांडुप संकुल येथे सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्रात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी एस विभागाचे सहाय्यक आयुक्त भास्कर कसगीकर, प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी सुरक्षा दलामार्फत संचलन, शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विविध स्पर्धा तसेच विशेष कामगिरी बजावणाऱ्या कर्मचारी व अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. विविध ठिकाणी सेवा बजावणाऱ्या सुरक्षा दलासाठी अद्ययावत सेवा व सुविधा तसेच गणवेश, आवश्यक उपकरणे आदी पुरविण्यात येतील, असे डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुंबई महापालिकेची मालमत्ता, कार्यालय आदींची चोख सुरक्षा करणाऱ्या सुरक्षा दलाचे बळकटीकरण करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), अत्याधुनिक व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून अधिकाधिक उत्तम सेवा देण्यासाठी पालिका कटिबद्ध आहे, असे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले. सुरक्षा दल अधिक अद्ययावत आणि बळकट करण्याचा तसेच मानसिक व शारीरिकदृष्ट्या सुदृढ करण्यात येणार असल्याचेही डॉ. शिंदे म्हणाले.

घनकचरा विभाग तसेच पर्जन्य जलवाहिन्या विभाग यासारख्या विभागांमध्ये अनेकदा सुरक्षा कर्मचारी वर्गाला डासांचा उपद्रव सहन करावा लागतो. त्यामुळे पालिकेच्या विविध विभागांच्या क्षेत्रात जवळपास ७०० चौक्यांच्या ठिकाणी कीटकनाशक यंत्रे लावण्यात येणार आहेत. एकूण सात ते दहा टप्प्यात ही यंत्रे उपलब्ध केली जातील. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३५ यंत्रे विविध चौक्यांमध्ये लावण्यात येणार असल्याची माहिती प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी दिली.

रुग्णालयात सुरक्षेसाठी 'एआय'चा वापर!

पालिकेच्या केईएम, लोकमान्य टिळक रुग्णालय, नायर रुग्णालय, बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व कुपर रुग्णालय या प्रमुख चार रुग्णालयांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या परिसरात येणाऱ्या वाहनांसाठी तसेच रुग्णांसाठी या कॅमेरा वापराचा परिणाम म्हणजे रुग्णालयातील नातेवाईकांचे साहित्य व मोबाईलच्या चोरीची प्रकरणे कमी झाली आहेत. रुग्णालयाच्या परिसरातील जमाव, आग यासारख्या दुर्घटनांची माहिती नियंत्रण कक्षालाही या कॅमेऱ्‍यातून उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे. तसेच अग्निशमन दलालाही या कॅमेऱ्याचा वापर करून सतर्क करणे शक्य होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in