पालिकेच्या हजारो निवासी डॉक्टरांना दिलासा; राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे मार्चपासूनची थकबाकी मिळणार, वेतनात १० हजारांची वाढ
मुंबई : पालिकेच्या निवासी डॉक्टरांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. मार्चपासून ही वेतनवाढ मिळणार ऑगस्ट महिन्याच्या वेतनात मिळणार आहे. पालिकेच्या निवासी डॉक्टरांना राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे फायदे मिळणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी सांगितले.
नव्याने येणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या निवासाची व्यवस्था, महागाई भत्ता, शिष्यवृत्ती आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले; मात्र प्रत्येकवेळी तोंडी आश्वासन यापलीकडे काहीच नाही. अखेर पालिका प्रशासनाने निवासी डॉक्टरांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, उर्वरित मागण्यांची पूर्तता लवकरच होईल, असा पालिका रुग्णालयाच्या संचालक डॉ. निलम अंद्रादे यांनी सांगितले.
पोस्ट ग्रॅज्युएट निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंड वेतन वाढीबाबत पालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली १० हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. मार्चपासूनची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनात मिळणार आहे. नायर, केईएम, सायन, कूपर व दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना लाभ मिळणार आहे; मात्र निवासी डॉक्टरांनी २२ जुलैपासून सामुहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तो त्यांनी मागे घ्यावा, असे आवाहन निवासी डॉक्टरांना केल्याचे डॉ. निलम अंद्रादे यांनी सांगितले.
लेखी उत्तरानंतर पुढील निर्णय
निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात अनेकदा आंदोलने केली. प्रत्येक वेळी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे २२ जुलैपासून सामुहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याआधी पालिका प्रशासनाकडून लेखी उत्तर मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या केईएम रुग्णालयाचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष गौरव नाईक यांनी सांगितले.