
मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने साफसफाईच्या कामाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने या संप करावा किंवा करू नये यासाठी घेतलेल्या मतदानानात संपाच्या बाजूने कौल दिल्यानंतर गुरुवारी आझाद मैदानावर मोर्चा काढत आंदोलन केले. यावेळी महापालिका कामगारांच्या संघटनांची भेट राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी घेत राज्याचे मुख्यमंत्री यांसोबत बैठक घडवून आणली. या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी निविदा प्रक्रियेचा पुनर्विचार करून कोणताही कामगार कपात होणार नाही याचा निर्णय घेतला जाईल तसेच सर्व कंत्राटी कामगारांना कायम केले जाईल, असे आश्वासन दिले.
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यासाठी सर्व कामगार आझाद मैदान येथे एकजूट झाले होते. यावेळी ॲक्शन कमिटीचे नेते माजी आमदार कपिल पाटील, कामगार नेते ॲड. सुरेश ठाकूर आणि विजय कुलकर्णी यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. कामगारांना प्रशासनाच्या वतीने खात्रीपूर्वक माहिती देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे मोर्चाला सामोरे जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनीच शिष्टमंडळाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानभवनात बोलावल्याचे येऊन सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला या आश्वासना बरोबरच सेवा-शर्तींमध्ये बदल होणार नाही. सर्व कंत्राटी कामगार कायम करणार असे सांगितले.
…...अन्यथा संपावर जाणार
सफाई कामगारांच्या सर्व स्थितीचा अभ्यास करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली जाईल, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच या आश्वासनाचा पालिका प्रशासनासोबत येत्या २३ जुलैपर्यंत करार करण्यात येणार आहे. जर पालिकेने लेखी करारास नकार दिला तर कामगार २३ जुलैपासून संपावर जाणार असल्याचे ॲक्शन कमिटीने सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने
-निविदा प्रक्रियेचा पुनर्विचार करून कोणतीही कामगार कपात होणार नाही याचा निर्णय घेणार.
-सफाई कामगारांची पदसंख्या कमी होणार नाही.
-सेवा-शर्तींमध्ये बदल होणार नाही.
-सर्व सद्य कंत्राटी कामगार कायम करणार.
-लाड पागेबाबतीत जो शासन निर्णय आला आहे त्याची संपूर्ण अंमलबजावणी करणार.
-सफाई कामगारांना मालकी हक्काने घरे देणार.