

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या तडाख्याने लोकांचा घामटा निघत आहे. त्यात रणरणत्या उन्हात पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचीही सहल राणीबाग व नॅशनल पार्कमध्ये काढण्याचा घाट घातला जात आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली कोणाचे भले करायचेय, कोणाच्या दबावाखाली हा प्रस्ताव आणला, असा सवाल शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी स्थायी समितीत केला.
दरम्यान, सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची दखल घेत पालिका प्रशासनाने सविस्तर माहिती सादर करावी, तोपर्यंत प्रस्ताव राखून ठेवल्याचे स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. बुधवारी स्थायी समितीची बैठक आणि आदल्या रात्री तातडीने पालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या सहलीचा प्रस्ताव स्थायी समिती सदस्यांना वितरीत करण्यात आला.
एवढ्या घाईगडबडीत प्रस्ताव आणण्याचे कारण काय, असा सवाल करत सभागृह नेते गणेश खणकर यांनी प्रस्ताव मंजूर न करता राखून ठेवा, अशी सूचना केली. इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी काढण्यात येणाऱ्या सहलीसाठी एकमेव संस्थेची निवड कशी केली, तब्बल ६६०० मुलांना घेऊन जाणारी ही संस्था सुपरमॅन आहे का? असा सवाल राजेश्री शिरवडकर यांनी उपस्थित केला.
सध्या परीक्षांचे दिवस आहेत, अशात या मुलांना कोणते पालक पाठवणार, असा सवाल त्यांनी केला. शिरवडकर यांच्या मुद्द्याला यामिनी जाधव यांनी पाठिंबा देत केवळ प्रत्येक मुलांमागे ७३० रुपये देण्यात येणार आहे, मग त्यांना खायला काय देणार, याचाही कुठेही उल्लेख नसल्याचे सांगितले.
सहल कुठे जाणार?
भायखळा राणीबाग : इयत्ता चौथी (एकूण मुले ३६,७२०)
सहलीसाठी येणारा खर्च : २ कोटी ३१ लाख ३३ हजार ६००
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
बोरिवली : इयत्ता सातवी (मुले २९,०६४ व माध्यमिक ८४६)
सहलीसाठी येणारा खर्च : २ कोटी ०९ लाख ३७ हजार रुपये