बालवाडी शिक्षिकांच्या मानधनात वाढ

९०० बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना दिलासा
बालवाडी शिक्षिकांच्या मानधनात वाढ

मुंबई महापालिकेच्या ९०० बालवाडी शिक्षिका व मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी शिक्षिकांना ५ हजार तर मदतनीसांना ३ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. परंतु आता शिक्षिकांना ८ हजार, तर मदतनीसांना ५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ९०० बालवाडी शिक्षिका व मदतनीसांना महागाईच्या काळात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मानधन वाढीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

पालिकेच्या शिक्षण विभागाच्या अंतर्गत बालवाडी चालवण्यात येतात. बालवाडी शिक्षिका व मदतनीसांनी आपल्या विविध मागण्यांकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले होते. शिक्षिका व मदतनीसांच्या आंदोलनानंतर पालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. वाढीव मानधनापोटी प्रशासनाला एक कोटी ४२ लाख रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी जाहिरात आणि प्रसिद्धीतून शिल्लक ८० लाख रुपये, सार्वजनिक वाचनालयांचे ४५ लाख रुपये, ऑलिम्पियाड परिक्षेतील १४ लाख रुपये तसेच, संदर्भ आणि ग्रंथालय पुस्तकांचे ३ लाख रुपये असे एकूण १ कोटी ४२ लाख रुपये शिल्लक आहेत. या तरतुदींतून हा खर्च भागवला जाणार आहे.

शिक्षण विभागाचे सक्षमीकरण करण्यात येत असून नवीन शैक्षणिक धोरणानुसार पूर्व प्राथमिक वर्ग प्राथमिक वर्गाशी जोडण्यात येणार आहे. प्राथमिक वर्गातील शिक्षकांना एक न्याय आणि पूर्व प्राथमिक वर्गातील शिक्षकांना एक न्याय हा दुजाभाव दूर केला पाहिजे. दरम्यान, खासगी संस्थांना बालवाडी चालवण्यासाठी न देता मुंबई महापालिका प्रशासनाने त्या स्वतः चालवाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

"मानधनात वाढ केली ही चांगली बाब आहे. परंतु बालवाडी मुंबई महापालिका स्वतः चालवत नसून संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येतात. त्यामुळे बालवाडीतील शिक्षिका व मदतनीसांना किती मानधन मिळत असेल हा विचार पालिका प्रशासनाने केला पाहिजे."

- शिवनाथ दराडे, मुंबई कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in